देवगड विठ्ठलवाडी ते दत्त मंदिर ‘मरीन ड्राईव्ह’च्या धर्तीवर सजणार
४० लाखांच्या पहिल्या टप्प्यातील संरक्षक भिंत कामाचे भूमिपूजन
पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाने एक कोटीचा निधी मंजूर
बुवा तारी व नागरिकांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार
देवगड : प्रशांत वाडेकर
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि नगरसेवक तथा स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी यांच्या पाठपुराव्यातून, जिल्हा वार्षिक नियोजन समितीअंतर्गत देवगड विठ्ठलवाडी पोकळे नाका ते किल्ला दत्त मंदिर या मार्गावर संरक्षक भिंत व सुशोभीकरणासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील ४० लाख ८१ हजार २५ रुपयांच्या कामाचे भूमिपूजन रविवारी ज्येष्ठ नागरिक प्रदीप पारकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
देवगड विठ्ठलवाडी ते दत्त मंदिर हा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने येथे वारंवार वाहतुकीची कोंडी होत असे. या समस्येमुळे देवगड किल्ला मारुती मंदिरापर्यंत जाणारी एसटी बस सेवाही बंद करण्यात आली होती. मात्र, आता संरक्षक भिंतीच्या बांधकामामुळे या मार्गाला एक पर्यायी आणि रुंद रस्ता उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, हा रस्ता मुंबईच्या ‘मरीन ड्राईव्ह’ च्या धर्तीवर विकसित केला जाणार असून, त्याचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रसंगी नगरपंचायतीचे स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, ग्रामस्थ अविनाश खडपकर, रवी गिरकर, राजू कावले, भाऊ पारकर, अवि खानविलकर, महेंद्र पारकर, नीरज पोकळे यांसह अन्य स्थानिक नागरिक उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी दोन्ही टप्प्यातील एक कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. देवगडच्या विकासासाठी आणि वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल नगरपंचायत स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी व ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष आभार मानले आहेत.


