देवगडमध्ये रंगणार २४ मार्चपासून क्रिकेटचा महासंग्राम 

Google search engine

देवगडमध्ये रंगणार २४ मार्चपासून क्रिकेटचा महासंग्राम 

‘यंगस्टार प्रिमियर लिग- आमदार चषक २०२६’चे भव्य आयोजन

विजेत्या संघाला मिळणार पाच लाखाचे बक्षिस 

मालिकाविराला मिळणार फोर व्हीलर गाडी

क्रीडा रसिकांनाही लकी ड्रॉ द्वारे मोटरसायकल 

देशभरातील खेळाडू येणार देवगडात 

पर्यटनासोबत क्रिकेट, येवा देवगड आपलाच आसा 

देवगड / प्रतिनिधी 

यंगस्टार क्रिकेट क्लब, देवगड यांच्या वतीने येत्या २४ ते २८ मार्च दरम्यान ‘यंगस्टार प्रिमियर लिग (YPL) – आमदार चषक २०२६’ या भव्य ऑल इंडिया ओपन, डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शेठ. म. ग. हायस्कूल, देवगड येथील क्रीडागंणावर रंगणार असून देशभरातील दर्जेदार संघ आणि नामवंत खेळाडूंचा सहभाग यामध्ये अपेक्षित आहे.

महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे देवगडच्या क्रीडा आणि सामाजिक क्षेत्राला मोठी चालना मिळाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

यंदाच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक म्हणून रोख ५ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक म्हणून २.५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. विजेत्या संघाला आकर्षक ‘YPL आमदार चषक’ प्रदान केला जाणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, विजेता संघमालक यांना वैयक्तिक पुरस्कार देण्यात येणार असून ‘यंगस्टार – स्टार ऑफ द टूर्नामेंट’ या किताबासह विजेत्या खेळाडूला ब्रँड न्यू Tata Tiago कार बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

या स्पर्धेला भारतातील प्रतिष्ठित ‘ISPL’ टेनिस क्रिकेट स्पर्धेची संलग्नता लाभली असून 7T7T या राष्ट्रीय स्तरावरील यूट्यूब चॅनलवरून संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी डोमेस्टिक क्रिकेटच्या धर्तीवर अत्याधुनिक स्टेडियम उभारण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

‘येवा देवगड आपलाच आसा’ या थीमद्वारे पर्यटनाला चालना

या वर्षी स्पर्धेची ‘येवा देवगड आपलाच आसा’ ही थीम विशेष आकर्षण ठरणार आहे. क्रिकेटसोबतच देवगडच्या निसर्गरम्य पर्यटन स्थळांचा अनुभव घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. देशभरातून येणाऱ्या खेळाडू आणि प्रेक्षकांना देवगडच्या पर्यटनाचा आनंद घेता यावा, तसेच स्थानिकांना आर्थिक लाभ मिळावा हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

खाद्यसंस्कृतीचाही मेळावा

स्पर्धेदरम्यान कोकणी आणि मालवणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी विविध फूड स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. इच्छुक स्टॉलधारकांनी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंगस्टार रीयुनियन वीक

या स्पर्धेच्या निमित्ताने ‘यंगस्टार रीयुनियन वीक’ साजरा करण्यात येणार असून जुन्या-नव्या खेळाडूंना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन आणि नवोदितांचा उत्साह यामुळे क्रीडा वातावरण अधिक रंगणार आहे

या आयोजनाची माहिती देताना बुवा उर्फ निवृत्ती तारी, मिलिंद मोरये, चंदन घाडी, ऋत्विक धुरी, शैलेश भुजबळ, मोसिन होलसेकर, मुक्तार शेख, सचिन जातेकर, सुनील पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यंगस्टार क्रिकेट क्लबच्या वतीने देशभरातील क्रिकेटप्रेमींना या भव्य स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.