खो-खो विश्वावर शोककळा
राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती तेजस्विनी सनगले काळाच्या पडद्याआड
अपघातानंतर पंधरा दिवसांची झुंज अपुरी
वांझोळे गावाची ‘सुवर्णकन्या’ हरपली
अकाली अस्ताने हरपली तेजस्विनीची चमक
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख जवळील वांझोळे (सनगलेवाडी) या गावातून उगवलेली राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती तेजस्विनी जयेंद्र सनगले (वय १८) हिचे उपचारादरम्यान कोल्हापूर येथे निधन झाल्याने संपूर्ण क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. गेल्या दोन आठवड्यांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती; मात्र बुधवारी रात्री ही झुंज अपुरी ठरली आणि एक उज्ज्वल कारकीर्द अकाली संपली.
‘खो-खो पंढरी’ची उज्वल ओळख हरपली
वांझोळे गाव हे गेल्या काही वर्षांत ‘खो-खो खेळाडूंची खाण’ म्हणून नावारूपाला आले होते. याच मातीतून घडलेली तेजस्विनी सनगले ही त्या परंपरेतील एक तेजस्वी तारा होती. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी भुवनेश्वर (ओडिशा) येथे झालेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत तिची निवड झाली होती आणि तिने आपल्या चपळ खेळाच्या जोरावर संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. अल्पवयातच राष्ट्रीय खेळाडू म्हणून मिळवलेला मान तिच्या प्रतिभेची साक्ष देणारा ठरला.
चपळाई, जिद्द आणि विजेच्या वेगाचा संगम
उंचीने लहान असली तरी खेळात मात्र ‘महान’ ठरलेली तेजस्विनी मैदानावर चपळाई, वेग आणि अचूक डावपेचांचा उत्कृष्ट संगम सादर करत असे. अनेक स्पर्धांमध्ये तिने एकहाती सामने जिंकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. विजेच्या वेगाने प्रतिस्पर्ध्यांना गाठणारी ही खेळाडू आज अचानक सर्वांना सोडून गेल्याने प्रत्येकाच्या मनाला वेदनेचा चटका बसला आहे.
अपूर्ण राहिलेले स्वप्न; गावावर शोककळा
खो-खोच्या मैदानावर जिद्दीने लढत अनेक विजय मिळवणारी तेजस्विनी सनगले आयुष्याच्या लढाईत मात्र हरली, ही बाब सर्वांसाठी असह्य ठरत आहे. तिच्या अकाली निधनामुळे सनगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वांझोळे गावासह संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी ही एक मोठी हानी मानली जात असून भविष्यात मोठी कामगिरी करणारी एक गुणी खेळाडू हरपल्याची हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे.
संघटनेकडून श्रद्धांजली
जिल्हा व राज्य खो-खो संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या गुणी खेळाडूबद्दल दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.


