राजू शेट्टींच्या ‘त्या’ विधानामुळे कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये भीती;

Google search engine

राजू शेट्टींच्या ‘त्या’ विधानामुळे कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये भीती;

सिंधुदुर्ग ॲग्रो मार्केटीयर्स असोसिएशनचा निषेध

 

देवगड / प्रतिनिधी

निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा आणि काजू बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले असताना, शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी कीटकनाशक विक्रेत्यांविरोधात केलेले वक्तव्य चिथावणीखोर आणि दुर्दैवी आहे, असा आरोप सिंधुदुर्ग ॲग्रो मार्केटीयर्स असोसिएशनने केला आहे. या विधानामुळे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, असोसिएशनने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

​येथील मराठा मंडळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत सावंत बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष ऋषिकेश परब, सचिव पंकज दळी, स्वप्निल चमणकर, एकनाथ तेली, विनायक जोईल, जयश्री मुंडे उपस्थित होते.

​१२ मार्च २०२६ रोजी ओरोस येथे आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये बोलताना राजू शेट्टी यांनी बागायतदारांना संबोधित केले होते. यावेळी त्यांनी विक्रेत्यांची उधारी देऊ नका, असे आवाहन करत “काही कारवाई झाल्यास मी बघून घेईन,” असे विधान केले होते. या वक्तव्यानंतर जिल्ह्याच्या काही भागांत कार्यकर्त्यांकडून विक्रेत्यांना धमकावण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.

​हेमंत सावंत म्हणाले की, जिल्ह्यातील बागायतदार आणि विक्रेत्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. दरवर्षी विक्रेते सुमारे ९० कोटी रुपयांचा माल शेतकऱ्यांना उधारीवर देत असतात. कोकणी शेतकरी सुज्ञ आहे, मात्र अशा विधानांमुळे नाहक गैरसमज पसरवले जात आहेत. बँकांकडून कर्ज काढून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना अशा प्रकारे लक्ष्य करणे चुकीचे आहे. शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र ही एकाच साखळीचे दोन दुवे आहेत. विश्वासावर चालणाऱ्या या व्यवसायात राजकीय हेतूने फूट पाडू नये.

​नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या आम्ही पाठिशी आहोत, पण विक्रेत्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही यावेळी असोसिएशनच्या वतीने देण्यात आला. चिथावणीखोर वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.