शालेय आरोग्य तपासणीमुळे वाचले चिमुकलीचे प्राण
पडेल येथील मानवी राघवची हृदयशस्त्रक्रिया यशस्वी
देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील पडेल येथील दहावर्षीय मानवी अमोल राघव हिला जन्मजात हृदयरोगासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई येथील श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल, खारघर (चाईल्ड हार्ट केअर) येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रवि त्र्येनंतर मानवीच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ती आता निरोगी आहे. या यशस्वी उपचाराबद्दल कु. मानवीच्या कुटुंबियांनी देवगड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश पाटोदेकर व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथकाची भेट घेऊन आभार व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मानवीला नवसंजीवनी मिळाली असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. शालेय आरोग्य तपासणीदरम्यान राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब देसाई आणि डॉ. विजया कावले यांनी मानवी हिच्या आजाराचे प्राथमिक निदान केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वुमन हॉस्पिटल-कुडाळ येथे ‘टूडी इको’ शिबिरात मानवीच्या जन्मजात हृदयविकाराचे निदान करण्यात आले. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील देवगड येथील पथकामधील वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब देसाई, डॉ. विजया कावले, औषध निर्माण अधिकारी शुभ्रा खरात व आरोग्य सेविका साक्षी खानविलकर यांनी मानवीच्या कुटुंबियांचे समुपदेशन केले व शस्त्रक्रिया निश्चित करण्यात आली. त्यानंतर नवी मुंबई येथील श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल, खारघर (चाईल्ड हार्ट केअर) येथे मानवी हिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेमुळे आजाराचे योग्य व लवकर निदान, समुपदेशन आणि वेळेवर उपचार यांचे महत्व अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, मानवी व तिच्या कुटुंबियांनी देवगड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश पाटोदेकर यांच्यासह राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे डीपीएस राजेश पारधी, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या देवगडमधील पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित कोळी, डॉ. रुपाली पोकळे, औषध निर्माता नीलेश जोग, आरोग्य सेविका ज्योत्स्ना लब्दे यांचे आभार मानले.


