‘महाराष्ट्र केसरी २०२५- बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

Google search engine

महाराष्ट्र केसरी २०२५- बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

पुणे /प्रतिनिधी 

वाघोलीत होणाऱ्या ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण व मानाच्या गदेचे पूजन राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुंबईत  उत्साहात संपन्न झाले.

 वर्षा या शासकीय निवासस्थानी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पर्धेच्या नियोजनाची सविस्तर माहिती घेत आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले व स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन  १८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत वाघोली, पुणे येथे करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै. योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, नगरसेवक अनिल सातव पाटील महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव संजय शेटे तसेच नटराज सातव पाटील, सुनील (चाचा) जाधवराव, राहुल सातव, केतन जाधव, सागर सातव, महेश माने, मुकेश सातव, संदीप वारे, मयूर सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

 
कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ  विजेत्यास मानाची गदा

मुळशीतील मामासाहेब मोहोळ कुटुंब तर्फे महाराष्ट्र केसरी विजेत्यास मानाची गदा देण्याची परंपरा आहे. केंद्रीय राज्यमंत्रि मुरलीधर मोहोळ यांच्यावतीने यंदा गदा देण्यात येणार आहे.
 कुस्तीला लोकप्रियता आणि सर्वमान्यता मिळवून देणे आवश्यक आहे. कुस्ती स्पर्धेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी स्पर्धा दर्जेदार होणे आवश्यक आहे असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

सुनेत्रा पवारांनी पूजली ‘मानाची गदा’

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनी  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाची गदा पूजण्यात आली. “कुस्ती ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे, अशा प्रतिष्ठित स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मल्लांना मोठे व्यासपीठ मिळते,” अशा भावना व्यक्त करून त्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.