राहुल गांधींच्या विरोधात देवगडमध्ये भाजपची निदर्शने
प्रशांत वाडेकर/ देवगड
काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या मकर प्रवेशव्दाराच्या बाहेर २० खासदारांसमवेत चायपार्टी केल्याच्या निषेधार्थ देवगड भाजपा मंडळाच्या वतीने कार्यालयासमोर राहुल गांधींच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली.
यावेळी “राहुल गांधी हाय हाय..राहुल गांधींचा निषेध असो, या राहुल गांधींचे करायचे काय खाली डोके वर पाय” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मंडळ अध्यक्ष सदाशिव उर्फ राजा भुजबळ, भाजपचे नेते बाळ खडपे, शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, भाजपा नगरपंचायत गटनेते शरद टूकरूल, नगरपंचायत स्वच्छता सभापती व भाजपा तालुका उपाध्यक्ष बुवा तारी, महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. प्रियांका साळसकर, तालुका अध्यक्ष उष:कला केळुस्कर, शहर अध्यक्ष सौ. तन्वी शिंदे, नगरसेविका सौ. मनीषा जामसंडेकर, पंचायत समिती सदस्य सौ. स्नेहा अनभवणे, अक्षता घाडी, भाजपा देवगड जामसंडे युवा मोर्चा शहर अध्यक्ष दया पाटील, देवगड जामसंडे माजी शहर अध्यक्ष योगेश पाटकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, ज्ञानेश्वर खवळे, बापू जुवाटकर, गणपत गावकर, यश रानडे, व्ही . सी. खडककर, नगरसेवक चंद्रकांत कावले, श्री. कोयघाडी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंडळ अध्यक्ष श्री. भुजबळ म्हणाले, १२ मार्च २०२६ रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेट चालू असताना मकर प्रवेशद्वारच्या बाहेर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षातील जवळपास २० खासदारांनी चहा-बिस्कीट बरोबर ‘चायपार्टी’ आयोजित केली. ही अत्यंत खेदजनक व आक्षेपार्ह बाब आहे. संसद ही आपल्या देशाची सर्वोच्च लोकतंत्र संस्था आहे, त्याची प्रतिष्ठा व मर्यादा राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. परंतु या घटनेच्या माध्यमातून संसद परिसरात एकप्रकारे ‘पार्लमेंट पिकनिक स्पॉट’ बनविण्याचे विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आले. विशेष म्हणजे मकर प्रवेश द्वाराजवळ कुठलेही धरणे-प्रदर्शन करू नये असे लोकसभा अध्यक्षांचे स्पष्ट निर्देश असतांनाही विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रवेशद्वारासमोर बसून विरोध करण्याची नौटंकी केली. जे संसदीय नियमांची आणि अध्यक्षांच्या आदेशांची अवहेलना करणारे आहे.
यावेळी देशात घरगुती गॅसची कथित टंचाई असल्याचा भ्रम सर्वत्र पसरविण्याचे कटकारस्थान काँग्रेसने केले. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशाच्या प्रत्येक नागरिकाला ऊर्जा सुविधा पुरविण्याकरिता वचनबध्द होऊन सातत्याने काम करीत आहे.
आपण आपल्या जिल्ह्यामध्ये धरणे-प्रदर्शन कार्यक्रमात सहभागी झालेल्या काँग्रेस व काँग्रेसच्या खासदारांविरोधात आज जोरदार निदर्शने केली असल्याचे त्यांनी सांगितले.


