फोन वाजतोय..पण उचलत कोणीच नाही!

Google search engine

फोन वाजतोय..पण उचलत कोणीच नाही!

एस. टी. चा भोंगळ कारभार

तीन महिने पाठपुरावा करूनही ७२ टक्के बस स्थानकाचे संपर्क क्रमांक बंद

प्रवाशांच्या गैरसोयीसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

 

देवगड / प्रतिनिधी
‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान’ केवळ रंगरंगोटी आणि पारितोषिकांपुरते मर्यादित राहू नये, तर प्रवाशांना मिळणारी ‘प्रत्यक्ष सेवा’ महत्त्वाची आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही एसटी प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असून प्रवाशांची गैरसोय सुरूच आहे, असा घणाघाती आरोप सुराज्य अभियानाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ. रवीकांत नारकर यांनी केला आहे.

हॉटेल वेदा येथे झालेल्या पत्रकार परिषदेला हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक राजेंद्र पाटील, सनातनचे धर्मप्रसारक सदगुरू सत्यवान कदम, सुराज्य अभियानाचे समन्वयक डॉ. रविकांत नारकर, सह समन्वयक भास्कर खाडिलकर, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण दुधवडकर, समितीचे आनंद मोंडकर, सनातन संस्थेचे अनिरुद्ध दहिबावकर, विजय पवार, अनंत परुळेकर उपस्थित होते.

सुराज्य अभियानाने केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीतून एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील एकूण ४१३ बसस्थानके आणि आगारांच्या संपर्क क्रमांकांची तपासणी केली असता, त्यापैकी केवळ ११८ (२८%) क्रमांक कार्यान्वित आढळले, तर तब्बल २९६ (७२%) क्रमांक बंद किंवा प्रतिसाद न देणारे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला आणि सावंतवाडी यांसारख्या प्रमुख स्थानकांचीही हीच दयनीय अवस्था आहे.

“बसस्थानकाच्या दूरध्वनी यंत्रणेसाठी दरमहा ठराविक निधी (बजेट) दिला जातो. जर प्रवाशांना ही सुविधा मिळतच नसेल, तर हा पैसा नेमका जातो कुठे?” असा थेट प्रश्न डॉ. नारकर यांनी उपस्थित केला आहे. इतकी वर्षे प्रवाशांच्या सुविधेच्या नावाखाली खर्च झालेली रक्कम संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून व्याजासह का वसूल केली जाऊ नये? असा सवाल करत त्यांनी प्रशासकीय जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.
अधिकृत मोबाईल क्रमांक बंद लँडलाईनला सक्षम पर्याय म्हणून प्रत्येक स्थानकासाठी अधिकृत मोबाईल क्रमांक देऊन तो संकेतस्थळावर अपडेट करावा, जाणीवपूर्वक फोन न उचलणाऱ्या किंवा प्रतिसाद न देणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई व्हावी, ‘डेपो क्लीनिंग इन्स्पेक्शन’मध्ये केवळ स्वच्छतेचीच नव्हे, तर संपर्क यंत्रणेचीही (Enquiry System) दर १५ दिवसांनी तपासणी अनिवार्य करावी असे यावेळी सांगण्यात आले.
या संदर्भात सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांच्या माध्यमातून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना तक्रारवजा निवेदन सादर करण्यात आले आहे. १३ मार्च २०२६ रोजी राज्यभरात घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आता प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. प्रवाशांच्या हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही सुराज्य अभियानाने दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण दुधवडकर म्हणाले की, राज्य परिवहन महामंडळचे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद आहे. मात्र, या ब्रीदवाक्याप्रमाणे महामंडळाचे प्रशासन वागताना दिसत नाही. यावेळी समितीचे राजेंद्र पाटील यांनी सुराज्य अभियानाच्या माध्यमातून होत असलेल्या आंदोलनांची माहिती दिली.