पडेल येथे २२ मार्च रोजी ‘सकल हिंदू संमेलन’चे आयोजन
देवगड:: (प्रशांत वाडेकर) : हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने ‘सकल हिंदू समाज, पडेल मंडल’च्या वतीने रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन पडेल कँटीन येथील श्री. बाळा साळवी यांच्या ‘हरदेव निवास’ येथे सायंकाळी ४ वाजता संपन्न होईल.
अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्मितीसाठी हिंदू समाजाने दिलेल्या प्रदीर्घ संघर्षाची आठवण करून देत, सध्या समाजासमोर असलेल्या विविध आव्हानांवर विचारमंथन करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. वाढते धर्मांतरण, लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि हिंदू समाजापुढील इतर धोक्यांविषयी समाजात जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.
या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रविकांत नारकर (पडेल) उपस्थित राहणार असून, प्रमुख वक्ते म्हणून श्री. श्रीनिवास पेंडसे (संगमेश्वर) मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भव्य दिंडी, स्फूर्तीगीते आणि प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले जाणार आहे.
या धर्मकार्यात हिंदू समाजातील प्रत्येक बांधव व भगिनींनी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज, पडेल मंडल, ता. देवगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.


