जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबा व काजू बागायतदारांचा विराट आक्रोश मोर्चा
शेतकऱ्यांच्या घोषणांनी सिंधुदुर्गनगरी दणाणली
विराट मोर्चाने शासनही जागे झाले
दहा दिवसांत नुकसान भरपाई नाही दिलात तर २३ मार्चला चक्काजाम
शेतकरी नेते राजू शेट्टी दिला सरकारला गंभीर इशारा
पालकमंत्री नितेश राणेंनी दिली मोर्चाला भेट
नुकसान भरपाई देण्याचे दिले आश्वासन
प्रशांत वाडेकर: सिंधुदुर्गनगरी
हापूस आंबा आणि काजू यावर्षी हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. वारंवार शासनाचे दरवाजे ठोठावून देखील कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना कोणतीच ठोस मदत मिळत नाही. शासन दखल घेत नाही त्यामुळे यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील कोकण स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी विराट आक्रोश मोर्चा काढला. या आक्रोश मोर्चाने शासनही हादरले आहे. या मोर्चात सरकारविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
गुरुवारी सकाळी सुमारे सव्वा अकराच्या सुमारास राजू शेट्टी हे मोर्चा स्थळी दाखल झाले. त्यानंतर ओरोस येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात जिल्ह्याचे उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी आमदार वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, संकेत नाईक, राजन तेली, एम. के. गावडे, बाबुराव धुरी, संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, गणेश गावकर, किरण टेंबुलकर, प्रशांत शिंदे, गणेश वाळके, तुषार पाळेकर, बाबू लाड, विलास रूमडे, विलास साळसकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध राजकीय नेतेमंडळी आणि मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचताच स्वाभिमान संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला जाग आणण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढल्याचे सांगितले. याच वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यासपीठावर येत मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. “आपण सरकारला हाक मारली आणि सरकार तात्काळ हजर झाले,” असे सांगत राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन मंत्री राणे यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, “बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही. सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसह तुमच्या मोर्चासमोर आलो आहे. यावर्षी आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माझ्या सूचनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा ९० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवण्यात आला आहे. नुकसानभरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार असून इतर प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हास्तरावरही बैठक घेण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी आंबा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली असून शब्दापलीकडे जाऊन कृती केली जाईल आणि आंबा-काजू बागायतदारांना न्याय दिला जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, कोकणातील शेतकरी आजपर्यंत कधीही शासनाविरोधात उभे राहिले नव्हते. मात्र यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. “आमच्या मागण्यांबाबत दहा दिवसांत ठोस निर्णय द्या. अन्यथा २३ मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्ग रोखण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास दिला तर वसुलीसाठी येणाऱ्या गाड्या पेटविल्या जातील,” असा इशाराही त्यांनी दिला. २२ तारखेपर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. जयेंद्र परुळेकर म्हणाले की, सरकार सहजासहजी आक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावर येत नाही. शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती पाहून सरकारला येथे येण्यास भाग पडले. हेच या मोर्चाचे यश आहे.
मोर्चादरम्यान माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली आणि गणेश गावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात आतापर्यंत शेतकऱ्यांनी एवढा मोठा आक्रोश मोर्चा कधीच काढला नव्हता. यावेळी नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा-काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून शेतकरी कसा सावरणार हा प्रश्न समोर उभा राहिल्याने कोकणातील शेतकऱ्यांना हे मोठे आंदोलन उभारावे लागले.
दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंत मिळालेल्या पोकळ
आश्वासनांमुळे या आंदोलनाचे नेतृत्व स्थानिक भूमिपुत्राकडे न जाता पश्चिम महाराष्ट्रातील स्वाभिमान शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे गेले, अशीही चर्चा या आंदोलनाच्या निमित्ताने रंगली.


