मुणगे-बांबरवाडीत सामाजिक बहिष्कार एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार

Google search engine

मुणगे-बांबरवाडीत सामाजिक बहिष्कार

एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार

देवगड पोलिसांत तक्रार दाखल

 

​देवगड / प्रतिनिधी
तालुक्यातील मुणगे-बांबरवाडी येथे एका कुटुंबाला सामाजिक कामातून वाळीत टाकण्यत आले आहे. या त्रासामुळे कुटुंबातील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आणि आता घराचा पाणीपुरवठा खंडित केल्याचा गंभीर आरोप पीडित ग्रामस्थाने केला असून, याप्रप्रकरणी देवगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या घटनेची चौकशी पोलिस यंत्रणेने सुरू केली आहे.


मुणगे-बांबरवाडी येथील रहिवासी आनंद रामचंद्र कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ मे २०२४ रोजी वाडीतील एका मंडळाच्या अध्यक्षांच्या घरी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आणि उपस्थितांनी मिळून कदम कुटुंबियांना वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून या कुटुंबाला कोणत्याही सार्वजनिक किंवा शुभ कार्यांत सहभागी करून घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

आनंद कदम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “या सामाजिक बहिष्कारामुळे माझ्या आईला, सौ. लिना रामचंद्र कदम, यांना मोठा मानसिक धक्का बसला. सततच्या छळामुळे ८ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे निधन झाले. अत्यंत खेदाची बाब म्हणजे, वाडीतील संबंधित गटातील एकही व्यक्ती माणुसकीच्या नात्याने आईच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहिली नाही.”

हा छळ इथेच थांबला नसून, ७ मार्च २०२६ रोजी कदम यांच्या वैयक्तिक पाण्याच्या पंपाची वायर अज्ञात व्यक्तींनी कापून टाकली. यामुळे कदम कुटुंबाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले असून त्यांनी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे.या प्रकरणी आनंद कदम यांनी देवगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आणि मानसिक छळाबाबत संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.