राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत देवगड ग्रामीण रुग्णालयात ३४ मुलांवर मोफत शस्त्रक्रिया

Google search engine

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत देवगड ग्रामीण रुग्णालयात ३४ मुलांवर मोफत शस्त्रक्रिया

 

देवगड : प्रशांत वाडेकर 

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत देवगड पथकाकडून ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची अंगणवाडी, शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीदरम्यान काही मुलांमध्ये शस्त्रक्रियेसंबंधित विविध आजार आढळून आले.

या मुलांसाठी ग्रामीण रुग्णालय देवगड येथे विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येतात. या शिबिरात मुलांची प्राथमिक तपासणी, रक्त तपासणी, एक्स-रे तसेच इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात येतात.सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी आवश्यक शारीरिक पात्रता (फिटनेस) तपासून मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात येतात.

या कार्यक्रमांतर्गत Tongue-tie, Phimosis, Hydrocele, Hernia तसेच Umbilical Hernia अशा विविध आजारांवरील शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात. ग्रामीण रुग्णालय देवगडचे वैद्यकीय अधीक्षक व तज्ञ शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश पाटोदेकर यांनी या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या असून त्यांना भूलतज्ञ डॉ. चव्हाण मॅडम यांचे सहकार्य लाभले.

एप्रिल २०२५ पासून आजतागायत ग्रामीण रुग्णालय देवगड येथे एकूण ३४ लाभार्थी मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध झाली असून पालकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

या सर्व शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाल्या असून त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल रा.बा.स्वा.का पथकाकडून विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील डॉ. रूपाली पोकळे, डॉ. अमित कोळी, डॉ. बाळासाहेब देसाई, डॉ. विजया कावले, आरोग्य सेविका श्रीमती ज्योत्स्ना लब्दे, श्रीमती साक्षी खानविलकर तसेच औषध निर्माण अधिकारी श्री. निलेश जोग व सौ. शुभ्रा खरात यांच्या एकत्रित सांघिक कार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे सुरू आहे.