हापुसवर निसर्गाची वक्रदृष्टी!
बागायतदार आर्थिक संकटात
खासदार नारायण राणेंचे केंद्रीय कृषीमंत्र्यांना मदतीचे साकडे
सिंधुदुर्ग: प्रशांत वाडेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादक सध्या भीषण संकटात सापडला असून, यंदा जिल्ह्याच्या एकूण उत्पादनात ८५ ते ९० टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून आंबा उत्पादकांसाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे.
नारायण राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, सततच्या हवामानातील बदलांमुळे, विशेषतः अवकाळी पाऊस, प्रदीर्घ थंडी आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंब्याचा मोहोर जळून गेला आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आणि कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पाहणीत उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने हापूस आंब्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा झालेल्या प्रचंड फळगळीमुळे हजारो बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने तातडीने केंद्रीय पथक पाठवून नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि बाधित शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी विनंती राणे यांनी केली आहे.
तसेच, भविष्यात हवामान बदलाचा कोकणातील बागायतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावरही त्यांनी पत्रात भर दिला आहे.



हापुसवर निसर्गाची वक्रदृष्टी!