देवगड पवनऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात ५ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प’ उभारावा

Google search engine

देवगड पवनऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात ५ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प’ उभारावा!

निनाद देशपांडे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली मागणी

देवगड: प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका हा अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत पोषक परिसर मानला जातो. या पार्श्वभूमीवर, देवगड येथील पवन ऊर्जा प्रकल्पाच्या परिसरातील मोकळ्या जागेचा वापर करून सुमारे ४ ते ५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा, अशी मागणी निनाद नितीन देशपांडे यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात श्री. देशपांडे यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका हा अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत पोषक भौगोलिक क्षेत्र असलेला आहे. देवगड येथील पवन ऊर्जा प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन उपलब्ध असून, त्या जागेचा प्रभावी व दूरदृष्टीने उपयोग करून सुमारे ४ ते ५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे सहज शक्य आहे.

सदर सौर ऊर्जा प्रकल्प हा विद्यमान पवन ऊर्जा प्रकल्पासोबत एकत्रित करून हायब्रिड (पवन + सौर) ऊर्जा प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आल्यास एकाच परिसरातून वर्षभर अधिक कार्यक्षम, सातत्यपूर्ण व शाश्वत वीज निर्मिती होऊ शकते. अशा प्रकारचा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राज्यातील एक आदर्श हरित ऊर्जा प्रकल्प ठरू शकतो.

या प्रकल्पामुळे देवगड तालुक्याच्या वीजेच्या गरजेचा मोठा भाग स्थानिक पातळीवर पूर्ण करण्यास मदत होईल. तसेच स्वच्छ, पर्यावरणपूरक व अक्षय ऊर्जेच्या निर्मितीला चालना मिळून राज्य व केंद्र शासनाच्या हरित ऊर्जा धोरणाला बळकटी मिळेल.

याशिवाय, या प्रकल्पाच्या उभारणी, संचालन, देखभाल, सुरक्षा व इतर पूरक सेवांमधून सुमारे २०० स्थानिक बेरोजगार युवक-युवतींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, ग्रामीण भागातील रोजगार वाढेल आणि युवकांचे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल.

तसेच, देवगड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निर्मित होणाऱ्या हरित विजेच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील नागरिकांना व उद्‌द्योगांना वीज दरामध्ये विशेष सवलत अथवा प्रोत्साहनपर योजना देण्याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी विनंती श्री. देशपांडे यांनी केली आहे.

यामुळे स्थानिक नागरिकांना या प्रकल्पाचा प्रत्यक्ष लाभ मिळेल आणि औ‌द्योगिक विकासालाही चालना मिळेल.
“ग्रीन देवगड – ऊर्जा स्वयंपूर्ण देवगड हे ध्येय प्रत्यक्षात आणण्याची ही सुवर्णसंधी असून, आपल्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निश्चितच साकार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

तरी आपण या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागामार्फत तातडीने पाहणी करून देवगड येथील पवन ऊर्जा प्रकल्प परिसरात हायब्रिड (पवन सौर) ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरु करावी, अशी विनंती केली आहे.

आपल्या सकारात्मक निर्णयामुळे देवगड तालुका ऊर्जा क्षेत्रात राज्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल, स्थानिक युवकांना रोजगार मिळेल. हरित ऊर्जा निर्मितीत मोठी भर पडेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असेही निवेदनात नमूद केले आहे.