करिअर कट्टा उपक्रमातील उल्लेखनीय योगदानाची राज्यस्तरावर दखल
चार प्राध्यापकांची राज्यस्तरीय समित्यांवर निवड
सिंधुदुर्गच्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा
देवगड : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महाविघालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय विविध समित्यांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉ.अजित दिघे, डॉं. निलम धुरी, डॉ.रमाकांत गावडे आणि प्राध्यापिका अक्षता मोंडकर या चार प्राध्यापकांची निवड झाली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वैभववाडी येथिल आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अजित दिघे यांची राज्यस्तरीय करिअर संसद समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे. २०२२ ते २०२६ अशी सलग चार वर्षे उत्कृष्ट राज्यस्तरीय जिल्हा समन्वयक पुरस्कार पटकाविला आहे. ते सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत
सावंतवाडी येथिल श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) च्या अर्थशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापिका डॉ. नीलम धुरी यांची स्टेट रिसोर्स सेंटर बँकिंग समितीमध्ये निवड झाली आहे. त्याच्या महिला सक्षमीकरण, साहित्य, सामाजिक कार्य आणि करिअर कट्टा उपक्रमातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. करिअर कट्टा राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेत उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक म्हणून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा बहुमानही त्यांनी मिळविला आहे.
बांदा येथिल रावसाहेब गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स अँड श्रीमती सरस्वतीबाई गणशेठ वाळके कॉलेज ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक डॉ. रमाकांत गावडे यांची राज्यस्तरीय आर्थिक साक्षरता समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे. ते गेल्या चार वर्षांपासून सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यांचे करिअर कट्टा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.
देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापिका अक्षता हरिश्चंद्र मोंडकर यांची राज्यस्तरीय स्टेट रिसोर्स सेंटर उद्योजकता विकास समिती तसेच राज्यस्तरीय करिअर संसद समिती सदस्य तसेच राज्यस्तरीय स्टार्टअप समन्वय समिती सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांना करिअर कट्टा अंतर्गत आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ तसेच सलग दोन वर्षे सिंधुदुर्ग उत्कृष्ट महाविद्यालय समन्वयक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
करिअर कट्टा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, उद्योजकता, आर्थिक साक्षरता, संशोधनवृत्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याचे कार्य या सर्व प्राध्यापकांनी प्रभावीपणे केले आहे. त्यांच्या राज्यस्तरीय समित्यांवरील निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक कार्याला नवी दिशा मिळणार असून विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच लाभ होणार आहे असे मत महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले.
यासर्व प्राध्यापकांचे शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.


