देवगडमध्ये बेकायदेशीर धंद्यांवर तात्काळ कारवाई करा
मनसेचे नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांना निवेदन
देवगड/प्रतिनिधी
देवगड शहरासह तालुक्यात वाढणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करून ते तात्काळ बंद करावेत, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने देवगड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त उपपोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले यांना सादर करण्यात आले.
तत्पूर्वी, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक उगलमुगले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
देवगड शहरात आणि सभोवतालच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री, गुटखा, मटका आणि बेकायदेशीर व्हिडीओ गेम पार्लर मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. यामुळे शहरातील तरुण पिढी या व्यसनांच्या आणि जुगाराच्या विळख्यात सापडली असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून भांडणे आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची गंभीर बाब मनसेने निवेदनाद्वारे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.
दारू विक्री आणि ३ पत्ती जुगाराच्या ठिकाणांचा उल्लेख:
निवेदनात दारू विक्रीची मुख्य ठिकाणे म्हणून देवगड, पडेल, मोंड, आणि कट्टा या भागांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, पडेल भागातील कलमांच्या बागांमध्ये ३ पत्ती सारखा जुगार मोठ्या प्रमाणावर खेळवला जात असल्याची माहितीही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या सर्व बेकायदेशीर अड्ड्यांवर तात्काळ छापे टाकून ते कायमचे बंद करावेत, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देतेवेळी मनविसे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम (पप्पू) जाधव, मनविसे शहराध्यक्ष अभिजित तेली, मनसे शहराध्यक्ष सौ. ममता धुरत, मनसे कार्यकर्ते आदित्य सारंग, प्रसाद सावंत, महमदतकी महमद शेख यांच्यासह मनसेचे इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेच्या या निवेदनाची गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षक संतोष उगलमुगले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तालुक्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांवर लवकरच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांना दिले.


