कुणकवण येथे सिझरियन शस्त्रक्रियेद्वारे गाय आणि साहिवाल वासराला नवजीवन
तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. माधव घोगरे यांची यशस्वी शस्त्रक्रिया!
देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील कुणकवण येथे प्रसूतीमध्ये उद्भवलेल्या गुंतागुंतीनंतर तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. माधव घोगरे यांनी यशस्वी सिझरियन शस्त्रक्रिया करून गाय आणि साहिवाल वासराला नवजीवन दिले.
कुणकवण गावातील माजी उपसरपंच श्रीराम विठ्ठल ठाकुरदेसाई यांच्या दुसऱ्या वेताच्या दुधाळ गाईला काल संध्याकाळपासून प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. मात्र, बराच वेळ होऊनही प्रसूती होत नसल्याने त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण केले. तपासणीदरम्यान वासराचे डोके पूर्णपणे ३६० अंशांमध्ये वळलेले (Abnormal Position) असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे नैसर्गिकरित्या (नॉर्मल) डिलिव्हरी होणे पूर्णपणे अशक्य बनले होते.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. माधव घोगरे यांना तत्काळ पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच डॉ. घोगरे यांनी कोणताही वेळ न गमावता सिझरियन (C-Section) शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांच्या कौशल्यामुळे ही गुंतागुंतीची सिझरियन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. कृत्रिम गर्भधारणा (AI) तंत्रज्ञानाद्वारे तयार झालेले साहिवाल जातीचे सुंदर वासरू आणि गाय या दोघांनाही सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.
माजी उपसरपंच श्री. श्रीराम ठाकुरदेसाई यांनी डॉ. माधव घोगरे आणि वैद्यकीय टीमचे वेळेवर लाभलेल्या मदतीबद्दल व यशस्वी उपचाराबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहेत.
डॉक्टरांच्या या तत्परतेमुळे आणि यशस्वी शस्त्रक्रियेमुळे गावातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.


