वाडा येथे विना परवाना सेंद्रिय खताचा साठा जप्त
कृषी विभागाची देवगड तालुक्यात धडक कारवाई
देवगड | प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील वाडा आंबेडकर चौक परिसरात विना परवाना सेंद्रिय खताची वाहतूक करून त्याचा अवैधरित्या साठा केल्याप्रकरणी कृषी विभागाने धडक कारवाई केली असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाडा परबवाडी येथील एका व्यक्ती यांच्याविरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वाडा आंबेडकर चौकाजवळील एका दुकानाच्या गाळ्यात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा साठा करण्यात आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार देवगड तालुका कृषी विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. तपासणीदरम्यान सुमारे १०० पोती सेंद्रिय खताचा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या खताची अंदाजे किंमत ५७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
सदर खताची वाहतूक आणि साठवणूक आवश्यक परवानगीशिवाय करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष कृषी विभागाने काढला आहे. यानंतर संबंधित गाळा सील करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी कृषी विभागाने देवगड पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा कृषी अधिकारीही देवगड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. कृषी विभागामार्फत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास देवगड पोलीस करणार आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित असलेल्या या कारवाईमुळे कृषी क्षेत्रात मोठी चर्चा रंगली असून अवैध खत विक्री व साठवणुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.


