डोक्यावर सुरक्षित छप्पर आणि डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू
देवगडमधील ‘या’ कुटुंबाला लाभले हक्काचे घर!
योगेश पाटकर ठरले धोपटे कुटुंबासाठी देवदूत’
प्रशांत वाडेकर/ देवगड
आजच्या राजकीय चिखलफेकीच्या आणि सत्तासंघर्षाच्या युगात, माणुसकीचा झरा अजूनही जिवंत असल्याचे एक अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण देवगडमध्ये समोर आले आहे. राजकारणापलीकडे जाऊन समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करत, भाजपचे माजी शहर अध्यक्ष योगेश पाटकर यांनी जामसंडे धोपटेवाडी येथील एका गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या कुटुंबाला स्वखर्चातून हक्काचे घर बांधून दिले आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मोडकळीस आलेल्या घरात ‘जीव मुठीत धरून’ जगणाऱ्या धोपटे कुटुंबासाठी योगेश पाटकर हे खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरले असून, त्यांच्या या संवेदनशील कार्याचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.
देवगड तालुक्यातील जामसंडे येथील प्रभाग क्र. १४, धोपटेवाडी येथे राहणाऱ्या चंद्रकांत धोपटे यांच्या आयुष्यातही अशीच एक भीषण वादळापूर्वीची शांतता पसरली होती. गरिबीचे चटके सोसत वयोवृद्ध चंद्रकांत धोपटे हे आपल्या पत्नी आणि मुलीसह आपल्या अत्यंत जीर्ण, मोडकळीस आलेल्या घरात ‘जीव मुठीत धरून’ जगत होते. डोक्यावरचे छप्पर कधी कोलमडून पडेल आणि काळ घाला घालेल, या भीतीच्या छायेखाली हे कुटुंब अहोरात्र वावरत होते. त्यातच वरुणराजाच्या आगमनाची चाहूल लागल्याने त्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अशा हलाखीच्या आणि हताश परिस्थितीत या कुटुंबाला गरज होती ती केवळ एका सुरक्षित आडोशाची, एका आश्वासक हाताची!
अंधार दाटलेला असतानाच एका कल्याणाचा दिवा तिथे तेवला. या प्रभागाचे पालकत्व स्वीकारलेले आणि भाजपचे माजी शहर अध्यक्ष योगेश पाटकर यांच्या नजरेतून धोपटे कुटुंबाची ही मूक वेदना सुटू शकली नाही. माजी मुख्यमंत्री व माजी खासदार नारायण राणे साहेब यांची लोकसेवेची शिकवण आणि आमदार नितेश राणे यांची जनसामान्यांच्या कल्याणाची प्रेरणा उराशी बाळगून योगेश पाटकर यांनी या कुटुंबाच्या अश्रूंना पुसण्याचा आणि त्यांच्या जीवनाला आधार देण्याचा भक्कम संकल्प केला.
”रात्रं-दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग…” अशा विदारक स्थितीत जगणाऱ्या धोपटे कुटुंबासाठी योगेश पाटकर हे केवळ एक राजकीय कार्यकर्ते म्हणून नव्हे, तर साक्षात ‘देवदूत’ म्हणून धावून आले.
कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहत श्री. पाटकर यांनी स्वखर्चाने धोपटे यांच्या घराशेजारी एका सुंदर, छोटसे घर बांधले.
ऐन पावसाळ्याच्या उंबरठ्यावर, जेव्हा आभाळ भरून आले होते, तेव्हा धोपटे कुटुंबाला केवळ घर मिळाले नाही, तर सुरक्षिततेचे अखंड कवच लाभले.
योगायोगही किती अपूर्व असावा! भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून देवगड शहरात वर्षभर विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. याच सुवर्णक्षणाचे सोने करत १० जून रोजी या नूतन वास्तूचा ताबा धोपटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला.
या मंगलप्रसंगी माजी आमदार ॲड. अजित गोगटे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे, मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, युवा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, महिला उपाध्यक्ष प्रियांका साळसकर आणि शहर अध्यक्ष तन्वी शिंदे यांनी आपली उपस्थिती लावून या कौटुंबिक आनंदाला अधिक प्रगल्भ केले.
तसेच, धोपटेवाडीतील ग्रामस्थ – सुनील धोपटे, गिरीश धोपटे, विजय धोपटे, रामचंद्र धोपटे, कृष्णा भुजबळ, प्रितेश डोंगरे, प्रकाश बाणे, श्रेयश धोपटे, सुरेश थोटम, सुहास बावकर, सीमा सावंत, प्रज्ञा धोपटे, अवंतिका भिडे, सानवी धोपटे आणि अनिल आपटे आदींनी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली.
कृतज्ञतेचे अश्रू आणि सुसंस्कृततेचे दर्शन
घराची किल्ली हातात पडताच चंद्रकांत धोपटे यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. कृतज्ञतेने ओथंबलेल्या मनातून त्यांनी थेट योगेश पाटकर यांच्या चरणी झुकले परंतु, थोर मनाच्या पाटकर यांनी त्यांना तात्काळ रोखले. “वृद्धांचे आशीर्वाद हेच खरे वैभव,” हा सुसंस्कृत विचार जपत पाटकर यांनी उलट चंद्रकांतजींच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. हा क्षण उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारा आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा ठरला.
त्याच सोहळ्यात नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुवर्ण आठवण म्हणून एक सुंदर फोटोफ्रेम पाटकर यांनी धोपटे कुटुंबाला भेट दिली, जी त्यांनी अत्यंत आदराने आपल्या नव्या घराच्या भिंतीवर लावली.
आजच्या राजकीय चिखलफेकीच्या युगात, सत्तेपलीकडे जाऊन समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणे किती गरजेचे आहे, याचा वस्तुपाठ योगेश पाटकर यांनी घालून दिला आहे. त्यांनी केलेले हे निःस्वार्थ कार्य केवळ एका कुटुंबाला घर देणारे नसून संपूर्ण राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक ‘आदर्श वस्तुपाठ’ ठरले आहे. धोपटे कुटुंबाच्या चेहऱ्यावरील हसू हीच योगेश पाटकर यांच्या संवेदनशीलतेची खरी पावती आहे!


