कुणकेश्वर ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय

Google search engine

कुणकेश्वर ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय

रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर यंत्रणा बसवणाऱ्यांना घरपट्टीत ५ टक्के अतिरिक्त सवलत

देवगड: प्रतिनिधी 

पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी देवगड तालुक्यातील कुणकेश्वर ग्रामपंचायतीने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. छतावरील पावसाचे पाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने संकलित करून भूजल पुनर्भरण करणारी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रणाली आणि १ किलोवॅटपेक्षा अधिक क्षमतेची ‘सोलर ऑन-ग्रीड’ प्रणाली कार्यान्वित करणाऱ्या करदात्यांना घरपट्टीमध्ये अतिरिक्त ५ टक्के सवलत देण्याची घोषणा ग्रामपंचायतीने केली आहे.

​हवामानातील बदल, अल निनोचा संभाव्य प्रभाव, घटते पर्जन्यमान आणि भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात भरपूर पाऊस पडत असला तरी एप्रिल-मे महिन्यात अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. देवगड तालुक्यातील कातळमय भूभागामुळे भूजल साठ्यांवरही मर्यादा येतात. त्यामुळे पावसाचे पाणी साठविणे व जमिनीत मुरविणे आवश्यक असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.

​या योजनेसोबतच सप्टेंबर २०२६ पूर्वी घरपट्टी भरणाऱ्या सर्व करदात्यांसाठी नियमित ५ टक्के करसवलतही सुरू ठेवण्यात आली आहे. जलसंवर्धन आणि ऊर्जा बचतीबाबत गावकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करून पर्यावरणपूरक विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या प्रशासकांनी सांगितले. गावाचा सर्वांगीण विकास हा लोकसहभागातूनच शक्य असून प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.