दहिबाव अन्नपूर्णा नदीतील गाळ काढण्यास प्रारंभ

Google search engine

दहिबाव अन्नपूर्णा नदीतील गाळ काढण्यास प्रारंभ

नाम फाउंडेशन व  देवगड जामसंडे नगरपंचायत संयुक्त उपक्रम 

नागरिकांना गढूळ पाण्याबाबत सतर्कतेचे आवाहन

देवगड /प्रतिनिधी

देवगड जामसंडे नगरपंचायत, दहिबाव ग्रामपंचायत, नारीर्गे ग्रामपंचायत आणि मिठबाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दहिबाव अन्नपूर्णा नदीतील गाळ काढण्याच्या महत्त्वपूर्ण कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. पाणीपुरवठा सुरळीत व दीर्घकालीन सक्षम करण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाला नाम फाउंडेशनचे दिग्विजय पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष साक्षी प्रभू, पाणी पुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, गटनेते शरद ठुकरूल, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळ खडपे, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, दहिबाव सरपंच सचिन नाचणकर, नारीर्गे सरपंच महेश राणे, शहराध्यक्ष वैभव करगुंटकर, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर खवळे, नगरपंचायत कर अधिकारी गायकवाड मॅडम, पाणी पुरवठा अधिकारी चारुदत्त पारकर, कुंदन घाडी, नाम फाउंडेशनचे दिग्विजय पाटील, पाणी पुरवठा फिटर शमशुद्दीन हवालदार तसेच दहिबाव व नारीर्गे येथील ग्रामस्थ आणि पाणी पुरवठा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहिबाव अन्नपूर्णा नदीतील गाळ साचल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असून भविष्यात उद्भवणारी संभाव्य अडचण टाळण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. नदीपात्र स्वच्छ झाल्यानंतर पाण्याचा प्रवाह अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, गाळ काढण्याचे काम सुरू असल्यामुळे पुढील सहा दिवस परिसरात गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळूनच वापरावे, असे नम्र आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.