खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देवगडमध्ये शिधा वाटप
देवगड /प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे देवगडमध्ये गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा शिधा वाटप करण्यात आला. या उपक्रमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘शेवटच्या घटकाचा विचार’ या तत्त्वाचा प्रभाव दिसून येतो, असे मत माजी आमदार अजित गोगटे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ७५ गरजू व्यक्तींना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे संच देण्यात आले. भाजपा देवगड तालुका युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील यांच्या पुढाकाराने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा भाजपा सरचिटणीस संदीप साटम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जनसेवेचा घेतलेला वसा सातत्याने चालू ठेवल्यास यश नक्कीच मिळते. लोकांच्या मनात स्थान निर्माण केल्यास कोणत्याही क्षेत्रात अपयश येत नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर संतोष किंजवडेकर यांनी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला देवगड तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, सचिव योगेश चांदोसकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, संतोष किंजवडेकर, माजी नगराध्यक्ष प्रियांका साळस्कर, योगेश पाटकर, नगरसेवक चंदू कावले, उमेश कनेरकर, प्रकाश गोगटे, निनाद देशपांडे, संजय तारकर आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले तर आभार पाणीपुरवठा सभापती तनवी चांदोस्कर यांनी मानले.


