आठ दिवसांत आंबा बागायतदारांसोबत बैठक आयोजित करा
सिंधुदुर्ग ॲग्रो मार्केटिंग असोसिएशन’ला आंबा व काजू बागायतदार संघाचे पत्र
देवगड, : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढील ८ दिवसांच्या आत शेतकरी, व्यापारी आणि संबंधित घटकांची तातडीची संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणी ‘सिंधुदुर्ग आंबा-काजू बागायतदार व व्यापारी महासंघा’चे अध्यक्ष आनंद उर्फ काका ढोके यांनी केली आहे. या कालावधीत बैठक न झाल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढील तीव्र निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी ‘सिंधुदुर्ग ॲग्रो मार्केटिंग असोसिएशन’च्या अध्यक्षांना पत्राद्वारे दिला आहे.
सध्या जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदार गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. यावर्षी झालेली उत्पादन घट, बाजारातील दराची अस्थिरता, औषध व खतांबाबत निर्माण झालेले विविध प्रश्न आणि व्यापारी व बागायतदार यांच्यातील समन्वयाचा अभाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या सर्व विषयांवर चर्चा करून मार्ग काढणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
या संदर्भात महासंघाच्या वतीने यापूर्वीही वारंवार बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, अद्याप असोसिएशनकडून कोणतीही बैठक घेण्यात आलेली नाही, याबद्दल श्री. काका ढोके यांनी पत्रात खेद व्यक्त केला आहे.
बागायतदारांच्या भावना आणि अडचणी समजून घेऊन योग्य तो निर्णय घेण्यासाठी असोसिएशनने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढील पाऊल उचलण्यास बांधील राहील, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.


