आठ दिवसांत आंबा बागायतदारांसोबत बैठक आयोजित करा

Google search engine

आठ दिवसांत आंबा बागायतदारांसोबत बैठक आयोजित करा

सिंधुदुर्ग ॲग्रो मार्केटिंग असोसिएशन’ला आंबा व काजू बागायतदार संघाचे पत्र

 

देवगड, : प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढील ८ दिवसांच्या आत शेतकरी, व्यापारी आणि संबंधित घटकांची तातडीची संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणी ‘सिंधुदुर्ग आंबा-काजू बागायतदार व व्यापारी महासंघा’चे अध्यक्ष आनंद उर्फ काका ढोके यांनी केली आहे. या कालावधीत बैठक न झाल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढील तीव्र निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी ‘सिंधुदुर्ग ॲग्रो मार्केटिंग असोसिएशन’च्या अध्यक्षांना पत्राद्वारे दिला आहे.

​सध्या जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदार गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. यावर्षी झालेली उत्पादन घट, बाजारातील दराची अस्थिरता, औषध व खतांबाबत निर्माण झालेले विविध प्रश्न आणि व्यापारी व बागायतदार यांच्यातील समन्वयाचा अभाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या सर्व विषयांवर चर्चा करून मार्ग काढणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

​या संदर्भात महासंघाच्या वतीने यापूर्वीही वारंवार बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, अद्याप असोसिएशनकडून कोणतीही बैठक घेण्यात आलेली नाही, याबद्दल श्री. काका ढोके यांनी पत्रात खेद व्यक्त केला आहे.

​बागायतदारांच्या भावना आणि अडचणी समजून घेऊन योग्य तो निर्णय घेण्यासाठी असोसिएशनने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढील पाऊल उचलण्यास बांधील राहील, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.