गिर्ये येथे सात फूट उंचीच्या भव्य बुद्ध मूर्तीची मिरवणूक
उद्या होणार प्रतिष्ठापना
देवगड : प्रशांत वाडेकर
गिर्ये बौद्धवाडी येथे १२ मे रोजी प्रतिष्ठापना होणाऱ्या भव्य सात फूट उंचीच्या बुद्ध मूर्तीची सोमवारी सायंकाळी गिर्ये कॅन्टीन ते गिर्ये बुद्ध विहार दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली. थायलंडवरून आणण्यात आलेल्या या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
माजी राज्यमंत्री भाई गिरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गिर्ये कॅन्टीन येथे मूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर मिरवणुकीला सुरुवात झाली. या सोहळ्याला सरपंच सौ. लता गिरकर, डॉ. रघुनाथ पोकळे, माजी जि. प. उपाध्यक्ष आरिफ बगदादी, गिर्ये बौद्धजन मंडळ मुंबईचे अध्यक्ष दीपक गिरकर, ग्रामीण अध्यक्ष संतोष गिरकर, सचिन गिरकर यांसह गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उद्या, १२ मे रोजी या भव्य मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना बुद्ध विहारात केली जाणार आहे.


