देवगड हायस्कूलमध्ये रंगला आठवणींचा सोहळा
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
देवगड : प्रशांत वाडेकर
देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघ आणि स्थानीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी शाळेमध्ये सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला होता.
या वेळी व्यासपीठावर देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार, सचिव शंकर धुरी, संयुक्त कार्यवाह निलेश प्रभू समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. अविनाश माणगावकर, स्थानीय समिती सदस्य मिलिंद कुबल,शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, उपाध्यक्ष प्रविण सावंत, माजी मुख्याध्यापक शांताराम कर्णिक, रणजीत दाते, माजी शिक्षक परशुराम आंबुलकर, माजी शिक्षिका वरदा दाते, मंदाकिनी गोडसे आणि शाळेचे माजी विद्यार्थी कर्नल राजाध्यक्ष, विद्यमान मुख्याध्यापक प्रविण खडपकर आदी उपस्थित होते.

कर्नल राज्याध्यक्ष यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेचे 1962 बॅचचे माजी विद्यार्थी कर्नल राज्याध्यक्ष आणि शाळेच्या 1953 बॅचच्या माजी विद्यार्थिनी सुमती बिडीये या जेष्ठ माजी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित माजी मुख्याध्यापक व माजी शिक्षक यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना राजाध्यक्ष यांनी ‘आजच्या कार्यक्रमाने मी पूर्ण भारावून गेलो. या शाळेमुळेच माझी प्रगती झाली. या शाळेचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही. शाळेच्या सर्व माजी विद्यार्थिनी एकत्र येऊन शाळेच्या विकासाची धुरा पुढे घेऊन जावी. यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे माझी तयारी आहे असे मत व्यक्त केले.
सुमती बिडये यांनी देखील शाळेमध्ये घालविलेल्या गतस्मृतींना उजाळा दिला. शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशा सदिच्छा देखील त्यांनी व्यक्त केल्या.
ॲड. अविनाश माणगावकर यांनी संस्थेमार्फत शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबवित असलेल्या आणि भविष्यकालीन योजना याची माहिती दिली. या योजना साकार करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी देखील पुढे यावे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून राबविले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांनी आपल्या मनोगतामध्ये अध्यक्ष म्हणून या माजी विद्यार्थी संघाचे काम सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करण्याचा मानस व्यक्त केला. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व माजी विद्यार्थी कटिबद्ध होण्याचे आवाहन देखील त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे निवेदन माजी विद्यार्थी आणि स्थानीय समिती सदस्य मिलिंद कुबल आणि माजी विद्यार्थिनी विद्या नलावडे माणगावकर यांनी अतिशय सुंदररित्या सादर केले. त्यांच्या निवेदनामुळेच सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांना शाळेमध्येच आपण असल्याचा अनुभव घेता आला. यामध्ये शाळेची घंटा देण्यापासून ते राष्ट्रगीत, शाळेचे ध्वजगीत आणि कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान हे सर्व अनुभवता आले.
उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी संस्थेमार्फत उत्तम प्रकारे अल्पोपाराची व्यवस्था देखील करण्यात आलेली होती.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, नाटक सादर केली. यामध्ये विद्या माणगावकर, शार्दुल रसाळ, प्रीतम पडेलकर, प्रणाली मेस्त्री, ज्योती तानवडे, मनीष मोंडकर, संजय पांचाळ, शेडगे, सानिका चव्हाण, भाग्यवी खडपकर, शिवानी मेस्त्री, विजय हरम, विद्याधर कार्लेकर, राजेंद्र हिंदळेकर, वंदना टीकम या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रविण खडपकर तर आभार राजेंद्र हिंदळेकर यांनी मानले.


