खंडित वीज पुरवठ्यावरून भाजप पदाधिकारी आक्रमक
संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर
देवगड /प्रतिनिधी
देवगड शहरातील काही भागात सलग २४ तास वीज पुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. सलग एक दिवस वीज नसल्याने केवळ जनजीवनच नव्हे, तर आरोग्य सेवाही कोलमडल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील कुलकर्णी मेडिकल समोरील रोहित्रात (ट्रान्सफॉर्मर) बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, बिघाड झाल्यानंतर तातडीने दुरुस्ती करणे किंवा रोहित्र बदलणे आवश्यक असताना महावितरणकडून कोणतीही जलद कार्यवाही करण्यात आली नाही. दुपारपर्यंत रोहित्र न बदलल्यामुळे संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
भाजपा मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल निमकर आणि शाखा अभियंता छाया परब यांना जाब विचारण्यात आला. महावितरणच्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे नागरिकांचे हाल होत असून वीज नसल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ग्राहकांना देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आरोग्य सेवांना मोठा फटका
वीज पुरवठा खंडित झाल्याचा गंभीर परिणाम देवगड ग्रामीण रुग्णालयातील सेवांवर झाला. रुग्णालयातील डायलिसिस सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती, तर अनेक रुग्णांना उपचार घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
या आंदोलनात तालुका सचिव योगेश चांदोसकर, युवा मोर्चा अध्यक्ष दया पाटील, माजी शहर अध्यक्ष योगेश पाटकर, व्यापारी संघाच्या महिला तालुकाध्यक्ष प्रियांका साळस्कर, व्यापारी बाळा जगताप, आनंदा रामाने, राजू भानुषाली, प्रफुल्ल भावे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.


