प्रजिमा १२ रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक
३० एप्रिलची ‘डेडलाईन’ अन्यथा १ मे पासून साखळी उपोषण
देवगड / प्रतिनिधी
पावणाई लाडवाडी ते धुरीवाडी या प्रजिमा १२ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, येत्या ३० एप्रिलपर्यंत या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण सुरू न झाल्यास १ मे पासून साखळी उपोषण करण्याचा इशारा पावणाई ग्रामपंचायतीने दिला आहे.
पावणाई परिसरातील ‘प्रमुख जिल्हा मार्ग १२’ वरील हा रस्ता सध्या पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खडी पसरल्याने वाहन चालवणे कठीण झाले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत ग्रामपंचायतीने गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार लेखी पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्याने अखेर ग्रामपंचायतीने आंदोलनाचे पाऊल उचलले आहे.
येत्या ३० एप्रिलपर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही, तर महाराष्ट्र दिन १ मे रोजी या मार्गावर योग्य त्या ठिकाणी साखळी उपोषण केले जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा सरपंच आणि ग्रामस्थांनी दिला आहे.


