देवगड येथे उद्या महाराष्ट्र शासनाचा कृषी महोत्सव २०२६
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
देवगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शनिवार, दिनांक २८ मार्च २०२६ रोजी देवगड तालुक्यातील जामसंडे येथील कै. मो. ज. गोगटे सांस्कृतिक भवन येथे ‘कृषी महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार असून, सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
या महोत्सवासाठी विभागीय कृषी सहसंचालक (ठाणे) शिवाजी आमले, प्रा. फ. सं. के. वेंगुर्ला येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे आणि कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे
राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान आणि पौष्टिक तृणधान्य उपअभियानांतर्गत या महोत्सवात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन, महिला बचत गटांची उत्पादने, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, शासकीय योजनांचे दालन, शेतकरी सन्मान सोहळा, शेती औजारे व आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रात्याक्षिके आणि ‘महाविस्तार AI’ नोंदणी ही प्रमुख आकर्षणे असणार आहेत.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्रे
या महोत्सवात विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये डॉ. वैभव शिंदे (मसाला पीक व्यवस्थापन), मिलिंद जोशी (मँगोनेट व निर्यात), यशवंत गव्हाणे (आंबा पुनरुज्जीवन), संदीप चोरगे (स्थानिक वाण संवर्धन) आणि नयन चेंदवणकर (मधुमक्षिका पालन) हे मार्गदर्शन करणार आहेत. तृणधान्य, फळपिके व भाजीपाला प्रदर्शनासह या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कृषी महोत्सवात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘भव्य लकी ड्रॉ’चे देखील आयोजन करण्यात आले आहे. देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी या महोत्सवात उपस्थित राहून माहिती आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी केले आहे.

