पाळीच्या अंधश्रद्धा झुगारून आरोग्याकडे लक्ष द्या
ज्योत्स्ना नार्वेकर : कर्ले महाविद्यालयात महिला दिनात स्त्री शक्तीचा जागर
शिरगांव / प्रतिनिधी
स्त्री ही शक्ती आहे, सृजनाची प्रेरणा आहे आणि समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभही आहे. स्त्रीचे आरोग्य सुरक्षित असेल तरच समाज निरोगी आणि सक्षम बनेल. विज्ञानाच्या दृष्टीने मासिक पाळी ही शरीराची सामान्य प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये लाज किंवा अपवित्रतेचा कोणताही संबंध नाही याबाबत जागरूकता निर्माण करणे हे स्त्री सशक्तीकरणाचे महत्त्वाचे पाऊल ठरेल असे मार्गदर्शन वेअर मोअर सोल्युशनच्या संचालक व आरोग्य सल्लागार ज्योत्स्ना नार्वेकर यांनी शिरगांव येथे केले.
देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष आणि विलेपार्ले येथील सुजय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्चला जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम पार पडला यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थीनींशी संवाद साधताना ज्योत्स्ना नार्वेकर म्हणाल्या, आज आपण महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या गप्पा मारतो, स्त्री चंद्रावर गेली असे अभिमानाने सांगतो. पाळी आली की स्वयंपाकघरात जाऊ नको,देवाला शिवू नको, लोणच्याला हात लावू नको अशा अनेक अंधश्रद्धा आजही आपल्या समाजात आहेत. विज्ञानाच्या युगात आपण हे समजून घेतले पाहिजे की, पाळीचा आणि विटाळाचा कोणताही संबंध नाही. हा केवळ शरीरातील संप्रेरकांचा बदल आहे. सामाजिक अंधश्रद्धांना मूठमाती देण्याची गरज आहे. पाळीच्या काळात आजही ग्रामीण आणि शहरी भागांत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. जुने कपडे वापरणे किंवा संकोचामुळे डॉक्टरांकडे न जाणे, यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
सॅनिटरी पॅड्सचा वापर वाढवला पाहिजे. याकाळात स्त्रीला स्वच्छता बाळगण्याची, आरामाची आणि मानसिक आधाराची गरज असते असे संवादा दरम्यान सांगितले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. मयूरी साटम आणि आरोग्य सेविका मिरा राठोड यांनीही विद्यार्थिनींना आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य आहार आणि वेळेवर तपासणी करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करीत सॅनिटरी पॅड्सचा वापर आणि विल्हेवाट याविषयी सविस्तर माहिती तसेच आरोग्यविषयक सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. विलेपार्ले येथिल सुजय हॉस्पिटलचे असिस्टंट मॅनेजर आणि शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रशांत चव्हाण यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम होते. यावेळी व्यासपिठावर संस्थेचे संचालक रविंद्र राणे, प्रशांत चव्हाण, हेमंत देसाई, प्राचार्य समीर तारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका मयूरी कुंभार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापिका सिद्धी कदम यांनी मानले.


