बालकांचे हक्क अन् संरक्षणाचे धडे
देवगडमध्ये अंगणवाडी व आशा सेविकांसाठी कार्यशाळा संपन्न
देवगड / प्रतिनिधी
जिल्हा महिला बालविकास कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आयोजित बालकांचे हक्क व अधिकार यांबाबत जनजागृती प्रशिक्षण कार्यशाळा अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याकरिता ११ मार्च २०२६ रोजी देवगड येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडली.
सदर कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम. रसाळ यांनी केले. या कार्यशाळेत वकील श्रीम. संगीता काळेकर यांनी महिलांचे हक्क व कायदे यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच वकील श्री. अन्वी कुलकर्णी यांनी बालकांचे हक्क व ‘पोक्सो’ (POCSO) कायद्याबाबत उपस्थित सेविकांना माहिती दिली. अंगणवाडी सेविका श्रीम. ओगले यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या अभियानासंदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात जिल्हा महिला व बालविकास कार्यालय अंतर्गत येणाऱ्या विविध योजना, संबंधित कार्यालये व सर्व महत्त्वाचे हेल्पलाइन क्रमांक याबाबत माहिती देण्यात आली. नवनियुक्त जिल्हा परिषद सभापती गणेश राणे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन व आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषद उपसभापती अमोल लोके यांनीही मनोगत व्यक्त करत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपस्थितांकडून ‘बालविवाह रोखण्याबाबत’ शपथ (प्रतिज्ञा) घेण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हा बाल संरक्षण कक्ष सिंधुदुर्गच्या श्रीम. सविता कांबळी, समुपदेशन केंद्र कुडाळचे महेंद्र जाधव, तालुका संरक्षण अधिकारी गौरव एखंडे, सखी वन स्टॉप सेंटरच्या समुपदेशक श्रीम. रुपाली प्रभू व बालविकास प्रकल्प अधिकारी रसाळ उपस्थित होत्या.
सदर कार्यशाळेचा लाभ तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित आशा व अंगणवाडी सेविकांनी घेतला.


