आंबा उत्पादक शेतकरी संकटात

0
Google search engine

आंबा उत्पादक शेतकरी संकटात

संपूर्ण कर्जमुक्ती आणि हेक्टरी ५ लाखांच्या मदतीसाठी राजू शेट्टींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

देवगड: प्रतिनिधी

कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या कात्रीत सापडला असून, सरकारने त्यांना तातडीने सावरण्याची गरज आहे. आंबा बागायतदारांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी किंवा हेक्टरी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

९० टक्के उत्पादनात घट

​राजू शेट्टी यांनी पत्रात नमूद केले आहे की, मोहोर गळती, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार आणि फळमाशीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे यंदा देवगडसह संपूर्ण कोकणात आंब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी उत्पादनात ९० टक्क्यांहून अधिक घट झाली असून, कीटकनाशकांचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

मुख्य मागण्या आणि कडक इशारा

​बागायतदारांच्या वतीने त्यांनी शासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत: कर्जमुक्ती व भरपाई: शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे किंवा ५ लाख रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी.
​बोगस औषधांची चौकशी: खते आणि कीटकनाशक कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, कृषी विभागाने या कंपन्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

AI तंत्रज्ञानाचा वापर

देवगड येथे अद्ययावत आंबा संशोधन केंद्र उभारून AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना हवामान आणि पीक संरक्षणाची माहिती उपलब्ध करून द्यावी.
​१२ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
​शासनाने आगामी अर्थसंकल्पात या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास, कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने १२ मार्च रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

​”राज्यातील कृषी आणि फलोत्पादन विभागाने उपाययोजना केवळ कागदावरच केल्या आहेत. शास्त्रज्ञांनी संशोधनावर भर देण्याची गरज होती, मात्र प्रत्यक्षात शेतकरी वाऱ्यावर आहे.”
— राजू शेट्टी, माजी खासदार