दुःखाच्या डोंगराखाली दबलेल्या खानविलकर मुलांच्या मदतीला धावला तेली समाज
दीड लाखांची मुदत ठेव व गृहपयोगी वस्तू सुपूर्त
प्रशांत वाडेकर/ सिंधुदुर्ग
नशिबाने नियतीचा असा काही फेरा फिरवला की, हरकुळखुर्द-खालची तेलीवाडी येथील खानविलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दीड वर्षांपूर्वी शरद खानविलकर यांचे निधन झाले, तर गेल्या जानेवारीत त्यांच्या पत्नी शारदा खानविलकर यांनीही आजारपणामुळे जगाचा निरोप घेतला. अवघ्या दीड वर्षात आई-वडिलांचे छत्र हरपल्यामुळे तन्वी, श्रीधर आणि प्रथमेश ही चिमुकली मुले पोरकी झाली. मात्र, ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत’ असा मदतीचा हात देत सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाने या मुलांच्या भविष्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि त्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे, या उद्देशाने जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाने जिल्ह्यातील समाजबांधवांच्या मदतीने १ लाख ५० हजार रुपयांचा निधी गोळा केला. ही रक्कम तन्वी, श्रीधर आणि प्रथमेश यांच्या नावे मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट) म्हणून बँकेत ठेवून त्याचे प्रमाणपत्र मुलांकडे सुपूर्त करण्यात आले.
’समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा’
याप्रसंगी कुणकेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष व मंडळाचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली यांनी मुलांशी संवाद साधला. “आई-वडिलांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही, पण तुमच्या शैक्षणिक वाटचालीत संपूर्ण जिल्ह्यातील तेली समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल,” असे भावनिक आश्वासन त्यांनी दिले. तसेच मंडळाचे सदस्य भूषण शेट्ये यांच्या माध्यमातून या कुटुंबाला आवश्यक जीवनावश्यक वस्तू व गृह उपयोगी साहित्य पुरविण्यात आले.
शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार
मुलांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर शासनाच्या विविध योजनांचा (उदा. संजय गांधी निराधार योजना, बाळसंगोपन योजना) लाभ मिळवून देण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर आणि कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे मंडळाने नमूद केले.
या हृदयस्पर्शी उपक्रमावेळी मंडळाचे उपाध्यक्ष परशुराम झगडे, निलेश कामतेकर, सचिव संजय कवटकर, खजिनदार दत्ताराम हिंदळेकर (ज्यांनी निधी संकलनासाठी विशेष प्रयत्न केले), शैलेश डिचोलकर, साईनाथ आंबेरकर, कणकवली अध्यक्ष महेश (बाळा) डिचोलकर, विशाल नेरकर, भूषण शेट्ये, आशिष खानविलकर, शशिकांत व वैभव खानविलकर उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष तुकाराम तेली यांनी या कार्यात मदत करणाऱ्या मुंबई व स्थानिक दानशूर व्यक्ती, एंपार फाऊंडेशन, ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांचे आभार मानले. “समाजातील इतर बहुउद्देशीय संस्थांनीही अशा गरजू मुलांच्या मदतीसाठी पुढे यावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ज्या वयात आई-वडिलांच्या मायेची गरज असते, त्या वयात पोरकेपण वाट्याला आलेल्या या मुलांच्या डोळ्यांतील पाणी पुसण्याचे काम तेली समाजाने केले आहे. माणुसकीच्या या ओलाव्याने खानविलकर मुलांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.


