कातवण समुद्रकिनारी सापडले दोन ऑक्सिजन सिलेंडर
मालवाहू जहाजातून पडले असण्याची शक्यता, पोलिस सतर्क, तपास सुरू
देवगड: प्रतिनिधी
तालुक्यातील कातवण समुद्रकिनारी शनिवारी दुपारच्या सुमारास दोन ऑक्सिजन सिलेंडर आणि काही संशयास्पद साहित्य आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक मच्छिमाराने सतर्कता दाखवत याबाबतची माहिती तातडीने देवगड पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व साहित्य ताब्यात घेतले असून, तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कातवण किनारपट्टीवर काही संशयास्पद वस्तू पडल्याचे एका स्थानिक मच्छिमाराच्या निदर्शनास आले. त्याने तात्काळ देवगड पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून देवगड पोलीस निरीक्षक श्याम बुवा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार पवार, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र महाले आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाला भेट दिली.
तसेच सखोल तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही (धोकादायक वस्तू तपासणी पथक) पाचारण करण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत सदर सिलेंडर हे ऑक्सिजनचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सिलेंडरसोबतच समुद्रकिनारी पाण्याचे पाऊच, प्रोटीन बिस्कीटचे पॅकेट्स, स्मोक सिग्नल आणि हँड फ्लेअर असे साहित्य मिळून आले आहे. पोलिसांनी या सर्व साहित्याचा रीतसर पंचनामा करून ते जप्त केले आहे.
जहाजावरून साहित्य पडल्याचा प्राथमिक अंदाज
समुद्रातून प्रवास करणाऱ्या एखाद्या मोठ्या जहाजावरून अथवा नौकेवरून हे ऑक्सिजन सिलेंडर आणि इतर आपत्कालीन साहित्य पाण्यात पडले असावे आणि ते वाहत या किनारपट्टीला लागले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांनी किंवा मच्छिमारांनी समुद्रात अथवा किनारपट्टीवर कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आल्यास किंवा अनोळखी वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन देवगड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.


