कुणकेश्वर ग्रामसभेत अणुऊर्जा प्रकल्प विरोधात एकमुखी ठराव 

Google search engine

कुणकेश्वर ग्रामसभेत अणुऊर्जा प्रकल्प विरोधात एकमुखी ठराव 

पर्यावरणपूरक प्रकल्पांचे स्वागत करण्याचा निर्णय 

 

देवगड / प्रतिनिधी

कुणकेश्वर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सोमवारी कुणकेश्वर भक्तनिवास येथे पार पडली. या सभेत अणुऊर्जा सारखे विनाशकारी प्रकल्पांना गावचा विरोध राहील. असे कोणतेही प्रकल्प शासनाने आणू नयेत . पर्यावरणपूरक प्रकल्प आणावेत त्यांचे स्वागत केले जाईल, असा एकमुखी ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.

या सभेला या सभेस जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, देवगड प. समिती उपसभापती अमोल लोके, प्रशासक महेश ताम्हणकर, ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली, तंटामुक्ती अध्यक्ष संजय आचरेकर आणि गावातील सर्व पुरुष, महिला ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांनी मागणी करताना सांगितले की, कोकणची ओळख ही पर्यटन, आंबा आणि मासेमारीवर उभी आहे. ही अशी क्षेत्रे आहेत जी केवळ रोजगार देत नाहीत, तर रोजगार निर्माणही करू शकतात. आंब्याचा दर्जा वाढवणे, देशभर विक्रीचे मजबूत जाळे उभे करणे, पर्यटनाचा विकास करणे आणि स्थानिक व्यवसायांना बळ देणे यावर भर दिला तर हजारो कुटुंबांना दीर्घकालीन फायदा होऊ शकतो.

ज्या भूमीत रोजगार निर्माण करण्याची क्षमता आधीपासून आहे, त्या भूमीवर प्रकल्प लादण्यापेक्षा स्थानिक विकासाला चालना देणे जास्त गरजेचे आहे
स्वयंरोजगार विकसित होणं आवश्यक आहे.
अगदी कुणकेश्वर च उदाहरणं घेतलं तरी आपल्या गावात लाखो भाविक पर्यटक येतात. हॉटेल, होम स्टे कसे वाढतील हे प्रयत्न व्हायला हवेत. कमी व्याजदराने किव्हा शून्य व्याजाने कर्ज पुरवठा जिल्हा बँकेकडून व्हावा. ह्याची मागणी व्हावी.

निसर्गाने आम्हाला भरभरून दिलय. त्याचाच वापर करून येथील आंबा उत्पादक, पारंपरिक मच्छिमार, पर्यटन व्यवसायाना सुविधा पुरविणारे कसे शासकीय प्रयत्नातून टिकतील ह्याचा विचार व्हावा, अशी मागणी केली.

अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठरावाला सूचक केदार ताम्हणकर तर दिनेश धुवाळी यांनी अनुमोदन दिले. मुणगे येथे अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असल्याच्या चर्चेने ग्रामस्थांमध्ये असंतोष व तीव्र भावना होत्या.

जिल्हा परिषद सदस्य भाई पारकर म्हणाले, विनाशकारी प्रकल्प कोकणात भविष्यात येणार असतील तर एक शेतकरी म्हणून, इथले स्थानिक म्हणून विरोधसाठी सर्वात पुढे आम्ही असू.
कोकणात पर्यावरण पूरक प्रकल्प भविष्यात येणार असतील तर ग्रामस्थांच्या सहमतीने, संमतीने त्यांना विश्वासात घेऊनच आणले जातील असं आश्वासन दिले.