देवगडमध्ये रोजगारासाठी युवकांची एल्गार रॅली
पर्यावरणपूरक विकास प्रकल्पांना पाठिंबा
देवगड / प्रतिनिधी
मुसळधार पावसाची तमा न बाळगता देवगडमधील युवकांनी स्थानिक रोजगार, विकास आणि पर्यावरणपूरक उद्योगांच्या समर्थनार्थ उत्स्फूर्त मोटरसायकल रॅली काढून आपल्या भावना ठामपणे व्यक्त केल्या. “आम्हाला देवगडमध्येच रोजगार हवा”, “आम्ही देवगड सोडणार नाही”, “पर्यावरणपूरक प्रकल्प झालेच पाहिजेत” अशा घोषणांनी संपूर्ण देवगड परिसर दणाणून गेला.
जामसंडे येथील दिर्बादेवी मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली शुक्रवार बाजारपेठ मार्गे देवगड शहरात पोहोचली. भर पावसातही मोठ्या संख्येने युवकांनी रॅलीत सहभाग घेतला. हातात घोषणाफलक आणि अंगावर “आम्हाला देवगडमध्ये रोजगार हवा” असा संदेश असलेले टी-शर्ट परिधान करून युवकांनी आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडल्या.
रॅलीत सहभागी युवकांनी पर्यावरणाचा समतोल राखणारे विकास प्रकल्प उभे राहावेत तसेच स्थानिक तरुणांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी भूमिका मांडली. रोजगारासाठी स्थलांतर करण्याऐवजी आपल्या मातीतच विकासाची संधी मिळावी, तुमच्या आई-वडिलांसोबतच आम्हाला यायचं आहे आम्हाला रोजगार इथेच पाहिजे. शासनाने आमच्या मागणीची दखल घ्यावी ही आजच्या तरुण पिढीची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भरधाव पावसातही युवकांचा उत्साह कमी झाला नाही. त्यांच्या घोषणांनी आणि शिस्तबद्ध रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनातून देवगडच्या नव्या पिढीचा आपल्या मातीत राहून प्रगती साधण्याचा निर्धार अधोरेखित झाला.
रॅलीच्या माध्यमातून युवकांनी पर्यावरणपूरक उद्योगांना पाठिंबा दर्शवित स्थानिक विकासाला चालना देण्याचे आवाहन केले. देवगडच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणारे उद्योग उभे राहावेत व स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळावे, हीच रॅलीची प्रमुख मागणी असल्याचे सहभागी युवकांनी सांगितले.
यावेळी साठी देवगड तालुक्यातून सुमारे २०० च्या आसपास सहभागी झाले होते मात्र वादळी वाऱ्यामुळे मुसळधार पाऊस असल्यामुळे काही युवकांनाही आणि सहभागी होता आणि नसल्याचेही यावेळी उपस्थित युवकांनी सांगितले


