*देवगडच्या सोहम ठाकूरचा राज्यस्तरावर सन्मान*
*महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा
‘संदूक’ला प्रकाशयोजनेचे तृतीय पारितोषिक
देवगड /प्रतिनिधी
६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत यूथ फोरम देवगड प्रस्तुत ‘संदूक’ या दोन अंकी नाटकाला प्रकाशयोजनेचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले असून, ही प्रकाशयोजना साकारणाऱ्या सोहम ठाकूर यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या (प्राथमिक फेरी) पारितोषिक वितरण समारंभात सोहम ठाकूर यांना ‘सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – तृतीय’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यूथ फोरम देवगड यांनी सादर केलेल्या ‘संदूक’ या दोन अंकी नाटकासाठी त्यांनी केलेल्या प्रभावी आणि आशयपूर्ण प्रकाशयोजनेची राज्यस्तरावर दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
या यशामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नाट्य क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोहम ठाकूर यांच्या या यशाबद्दल नाट्यरसिक, मित्रपरिवार आणि विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्यभरातील विविध नाट्यसंस्थांमधील दर्जेदार सादरीकरणांमध्ये स्थान मिळवत यूथ फोरम देवगडने आपल्या कलागुणांची छाप उमटविली आहे. या यशामुळे देवगडसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नाट्य चळवळीला नवी उभारी मिळाली असून, ग्रामीण भागातील कलाकारही राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
सोहम ठाकूर यांनी यापूर्वीही विविध नाट्यप्रयोगांतून प्रकाशयोजनाकार म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, या पुरस्कारामुळे त्यांच्या कलाप्रवासात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या या यशाबद्दल नाट्यरसिक, कलावंत, मित्रपरिवार तसेच देवगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे


