शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम व योजना कृषी विभागाने राबवाव्यात – गणेश राणे
देवगड पंचायत समितीच्या माध्यमातून मोंड हायस्कूल येथे कृषी मेळावा साजरा
जिल्हा परिषद कृषी विभाग, तालुका कृषी विभाग आणि ग्रामपंचायत मोंड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी मेळाव्याचे आयोजन
देवगड | प्रतिनिधी
“कृषी दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रमाचा दिवस नसून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काय देता येईल, त्यांच्या उत्पन्नात कशी वाढ करता येईल आणि कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबविता येतील, याचा गांभीर्याने विचार करण्याचा दिवस आहे. पंचायत समितीच्या मासिक सभेतही आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. शासनाच्या योजनांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नवीन योजना, सुधारित पिकांच्या प्रजाती आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी कृषी दिनानिमित्त देवगड पंचायत समितीच्या माध्यमातून मोंड हायस्कूल येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद कृषी विभाग, तालुका कृषी विभाग आणि ग्रामपंचायत मोंड यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात सभापती गणेश राणे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी निलेश जगताप, जिल्हा परिषद सदस्य सुयोगी घाडी, सौ. अवनी तेली, देवदत्त कदम, पंचायत समिती सदस्य संजना लाड, माजी उपसभापती डॉ. अमोल तेली, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी दिगंबर खराडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव घोगरे, कृषी विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत जोशी, अभिजित मदने, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दीपक तेंडूलकर, मोंडच्या सरपंच सौ. शामल अनभवणे, उपसरपंच अभय बापट, मोंडपारचे सरपंच गणेश तिर्लोटकर, वाघोटणच्या सरपंच संजना वानिवडेकर, वानिवडेच्या सरपंच मेधा सरवणकर, ग्रामसेवक महानंदा वराडकर, नाडणचे सरपंच संतोष कानडे तसेच उपसरपंच एकनाथ पुजारे उपस्थित होते.
सभापती गणेश राणे पुढे म्हणाले की, बोडस सर आणि कार्लेकर मॅडम यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केवळ कार्यालयापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण, कमी खर्चातील शेती पद्धती आणि अधिकाधिक फळझाडांची लागवड याबाबत शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी विभागाने पार पाडली पाहिजे.
गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारत हा कृषीप्रधान देश असून बदलत्या काळात तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेतीकडे वळणे गरजेचे आहे. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या योजनांची माहिती घेऊन आधुनिक शेतीचा स्वीकार केल्यास देशाच्या विकासात मोठे योगदान देता येईल.
उपसभापती अमोल लोके यांनी सांगितले की, देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा, अडचणी आणि सूचनांची सविस्तर माहिती या कृषी मेळाव्यात मिळाली. बोडस सर यांनी मांडलेले विचार आणि सूचना कृषी विभागासाठी दिशादर्शक आहेत. उपस्थित शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून कृषी विभागाबाबत असलेली नाराजीही समोर आली. ही बाब सकारात्मकपणे स्वीकारून कृषी विभागाने अधिक परिणामकारक काम करावे. पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकरी समृद्धीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव घोगरे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित करताना शेणखत व गांडूळखताच्या वापरात झालेली घट चिंताजनक असल्याचे सांगितले. गाव तेथे गोशाळा ही संकल्पना प्रभावीपणे राबविल्यास सेंद्रिय शेतीला चालना मिळून शेतीत मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञान आणि हवामान बदलाशी संबंधित उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. आंबा पीक नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रे अद्याप सादर न केलेल्या शेतकऱ्यांनी ती तातडीने सादर करावीत. लाभार्थी यादीत कोणाचे नाव राहिले असल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कृषी विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत जोशी यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सोनचाफ्याचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मोंड परिसरातील काजू प्रक्रिया युनिट मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मोंड हायस्कूल परिसरात सोनचाफा वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर अमोल तेली यांच्या वाढदिवस असल्याने त्यांना डॉक्टर डे च्या शुभेच्छा देत, वृक्षारोपण उपक्रमाची सुरुवात त्यांच्या हस्ते करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी उज्ज्वल झरकर यांनी केले.


