पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्ले गटात भव्य कार्यक्रम
अंगणवाडी विद्यार्थ्यांना छत्री, शालेय साहित्य व खेळणी वाटप
भाजपा पडेल मंडलचे आयोजन
फणसगांव / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोंभुर्ले जिल्हा परिषद गटात एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत पोंभुर्ले गटातील सर्व अंगणवाडीतील चिमुरड्या विद्यार्थ्यांना छत्र्या, शालेय वस्तू आणि खेळण्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक २३ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता प्राथमिक आरोग्यकेंद्र, फणसगांव येथे पार पडणार आहे. पडेल मंडलच्या वतीने या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पावसाळ्याच्या तोंडावर अंगणवाडीतील लहान मुलांना छत्री आणि शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पडेल मंडलचे अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. अनुराधा महेश नारकर हे आहेत. तसेच याप्रसंगी पोंभुर्ले पंचायत समितीचे सदस्य सादिक डोंगरकर आणि फणसगांव पंचायत समितीच्या सदस्या कु. समृध्दी चव्हाण प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
पोंभुर्ले जिल्हा परिषद गटातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पडेल मंडळ अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांच्यावतीने ‘पडेल मंडल’ने केले आहे.


