देवगड येथे २२ जून रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
देवगड: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड जामसंडे नगरपंचायत प्रभाग क्रमांक १ मधील तरवाडी, पिरवाडी, आणि कावलेवाडी येथील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत माजी नगरसेवक संजय तारकर यांच्या निवासस्थानी हे शिबिर संपन्न होणार आहे.
माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर व भाजपा शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांच्या विशेष पुढाकारातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र इळये व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, यात नागरिकांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
शिबिरामध्ये होणाऱ्या प्रमुख तपासण्या:
विद्यार्थ्यांसाठी: रक्तगट (Blood Group) तपासणी.
महिलांसाठी: विशेष हिमोग्लोबिन तपासणी.
सार्वजनिक तपासण्या: रक्तदाब (बी.पी.), रक्तातील साखर (मधुमेह तपासणी), कम्प्लीट ब्लड काउंट (सीबीसी).
विशेष चाचण्या: हृदयविकार रुग्णांसाठी ईसीजी (ECG), कॅल्शियम तपासणी, किडनी फंक्शन टेस्ट (KFT), आणि लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT).
”प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांसह परिसरातील सर्व बंधू-भगिनी, माता तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. आपल्या आरोग्याची खात्री करून घेण्याची ही उत्तम संधी आहे.”
— आयोजक व मित्रमंडळ
या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन भाजपा बूथ क्रमांक ६५ मधील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तरवाडी-पिरवाडी-कावलेवाडी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


