पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसादिवशी पडेल मंडळमध्ये होणार जनकल्याण सोहळा

Google search engine

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसादिवशी पडेल मंडळमध्ये होणार जनकल्याण सोहळा

 भाजप पडेल मंडलात विकासकामे, शिबिरे आणि सेवाकार्यांची रेलचेल

अंगणवाडी बालकांना साहित्य वाटप, शेतकऱ्यांसाठी मोफत फार्मर आयडी कॅम्प आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन

 

देवगड / प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या २३ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त पडेल मंडलात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाभिमुख उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवस केवळ औपचारिकतेपुरता न साजरा करता समाजोपयोगी कार्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात येत असल्याने संपूर्ण पडेल मंडलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पडेल मंडल भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये अंगणवाडी बालकांना साहित्य व खेळणी वाटप, अंगणवाडी सेविकांचा सन्मान, मोफत आधार व फार्मर आयडी कॅम्प तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण यांचा समावेश असून नागरिकांना थेट लाभ देणारे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

१७० चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर फुलणार आनंद

पोंभुर्ले जिल्हा परिषद गटामध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या गटातील तब्बल ३३ अंगणवाडी केंद्रांमधील सुमारे १७० बालकांना शालेय उपयोगी साहित्य व विविध खेळण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. बालकांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासालाही चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

याचबरोबर अंगणवाडी क्षेत्रात अहोरात्र कार्यरत असणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्री वाटप करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. समाजाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

शेतकरी आणि नागरिकांसाठी मोफत आधार व फार्मर आयडी कॅम्प

पुरळ जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मोफत आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती तसेच फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावीत आणि नागरिकांची धावपळ कमी व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या कॅम्पमुळे परिसरातील शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून अनेकांना शासकीय प्रक्रियांची पूर्तता सहजपणे करता येणार आहे.

विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पणाचा सोहळा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून पडेल आणि बापर्डे जिल्हा परिषद गटात विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने या विकासकामांचे भूमिपूजन तसेच पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.रस्ते, मूलभूत सुविधा आणि स्थानिक विकासाला चालना देणाऱ्या विविध कामांच्या माध्यमातून परिसराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. या कार्यक्रमांमुळे पडेल आणि बापर्डे परिसराच्या विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला जाणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

वाढदिवस म्हणजे समाजसेवेचा उत्सव’

“आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस केवळ केक कापून किंवा औपचारिक कार्यक्रमांनी साजरा करण्यापेक्षा समाजोपयोगी उपक्रम, लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांच्या माध्यमातून साजरा व्हावा, हाच पालकमंत्री नितेश राणेंचा विचार आहे. त्याच विचारातून पडेल मंडळाने विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे,” अशी भावना स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.२३ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या सर्व लोककल्याणकारी कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी पडेल मंडळातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पडेल मंडल भाजप व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.