देवगड जामसंडे नगरपंचायतीची प्लास्टिक बंदीविरोधात धडक मोहीम

Google search engine

देवगड जामसंडे नगरपंचायतीची प्लास्टिक बंदीविरोधात धडक मोहीम

शुक्रवार बाजारात मोठी कारवाई

  • ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ व ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत जनजागृतीसह प्लास्टिक जप्त
  • नियम मोडणाऱ्यांवर यापुढे दंडात्मक कारवाई होणार: प्रशासनाचा इशारा

देवगड /प्रतिनिधी

देवगड जामसंडे नगरपंचायतीमार्फत आज, शुक्रवार दिनांक २२ मे २०२६ रोजी, ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ आणि ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत शहरात विशेष प्लास्टिक बंदी जनजागृती व धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. शासनाने प्रतिबंधित केलेल्या आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या सिंगल युज प्लास्टिक व १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात ही कारवाई करण्यात आली.

​बाजारपेठ आणि व्यापारी आस्थापनांची तपासणी

मा. मुख्याधिकारी श्रीमती गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीने यासाठी विशेष तपासणी पथकाची नियुक्ती केली होती. आज शुक्रवारचा बाजार असल्याने या पथकाने शुक्रवार बाजार परिसर, देवगड सडा भाग १ व भाग २ यासह शहरातील विविध व्यापारी आस्थापनांना अचानक भेटी दिल्या. या तपासणी दरम्यान व्यापारी आणि ग्राहकांकडे आढळलेल्या १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, डिस्पोजेबल साहित्य व इतर प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले, तसेच संबंधितांना कडक समज देण्यात आली.

​पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती आणि आवाहन

या मोहिमेदरम्यान केवळ कारवाई न करता नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये जनजागृतीही करण्यात आली. प्लास्टिकमुळे माती, पाणी, समुद्र, सागरी जीवसृष्टी आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिली. ‘प्लास्टिकमुक्त देवगड’ ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना कापडी किंवा कागदी पिशव्यांचाच वापर करावा, असे आवाहन नगरपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.

​नागरिकांच्या सक्रिय सहभागाची गरज!

“शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ मध्ये देवगड जामसंडे शहराचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. भविष्यातही ही तपासणी मोहीम अशीच तीव्रतेने सुरू राहील आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.”

— नगरपंचायत प्रशासन, देवगड जामसंडे.

 

​मोहिमेतील सहभागी अधिकारी व कर्मचारी

या धडक मोहिमेत देवगड जामसंडे नगरपंचायतीचे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, अर्चना गायकवाड, स्वप्नील बुचडे, लिपिक चारुदत्त पारकर, कुंदन घाडी, निलेश बांदिवडेकर, गुरुप्रसाद अदम, राजदीप कदम, मुकादम मंगेश कदम, शहर समन्वयक राजेंद्र दळवी तसेच नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​नगरपंचायतीने उचललेल्या या धाडसी पावलाचे देवगडमधील सुजाण नागरिकांकडून स्वागत होत असून, पर्यावरण रक्षणासाठी अशा मोहिमा यापुढेही सातत्याने राबविल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.