देवगड-दहिबाव अन्नपूर्णा नदीचा गाळ उपसणार
पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे नियोजन पूर्ण
देवगड / प्रतिनिधी
पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या देवगड-दहिबाव अन्नपूर्णा नदीतील गाळ काढणे आणि पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती संदर्भात मंगळवारी देवगड नगरपंचायतीत महत्त्वपूर्ण नियोजन बैठक संपन्न झाली. या कामामुळे परिसरातील पाणी समस्या सुटण्यास मोठी मदत होणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.
नगरपंचायतीत पार पडलेल्या या बैठकीस नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, सभापती तन्वी चांदोस्कर, बुवा तारी, रोहन खेडेकर, मुख्याधिकारी गौरी पाटील आणि नगरसेवक नगरपंचायत अधिकारी उपस्थित होते. तसेच दहिबावचे सरपंच, नारिंग्रे व मिठबावचे ग्रामसेवक, ‘नाम’ फाऊंडेशनचे अधिकारी, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MGP) यांमधील वरिष्ठ अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि तांत्रिक नियोजन*
बैठकीनंतर सर्व पदाधिकारी आणि अधिकार्यांनी दहिबाव अन्नपूर्णा नदी परिसराला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी नदीपात्रातील गाळ काढणे, नळपाणी योजनेच्या विहिरीची स्वच्छता करणे आणि ट्रेंच गॅलरीच्या कामाचे तांत्रिक नियोजन स्थळावर जाऊन करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज झाली आहे.
*नळधारकांना माहिती दिली जाणार*
या कामाला लवकरच सुरुवात होणार असून, कामाच्या दरम्यान पाणीपुरवठ्यात होणारे बदल किंवा अन्य सविस्तर माहिती सर्व नळधारकांना वेळोवेळी कळविली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी कामाला गती मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


