हृदयद्रावक: गावखडी समुद्रात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
दोन चिमुरड्यांना वाचवण्यात पित्याला यश
मात्र स्वतःच्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यात अपयश
रत्नागिरी / प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. समुद्राच्या लाटांमध्ये ओढल्या जाणाऱ्या दोन मुलांना आणि पुतण्याला वाचवण्यासाठी एका पित्याने अथांग समुद्राशी झुंज दिली. दोघांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात त्यांना यश आले, मात्र स्वतःच्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यात अपयश आले. या दुर्घटनेत श्रेयश सागर गोसावी (वय १३) या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील असलेले सागर मोहन गोसावी हे सध्या रत्नागिरीतील मेर्वी येथे भंगार व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. शुक्रवारी शाळा लवकर सुटल्याने दुपारी दीडच्या सुमारास सागर गोसावी आपला मुलगा श्रेयश, मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज यांना घेऊन गावखडी येथील समुद्रकिनारी फिरायला गेले होते.
सुरूच्या बनासमोरील किनाऱ्यावर मुले पाण्यात खेळत असताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे तिघेही खोल पाण्यात ओढले जाऊ लागले. मुलांना बुडताना पाहून पित्याने क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उडी घेतली. जीवाची बाजी लावत त्यांनी आधी आरोही आणि देवराज यांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. मात्र, श्रेयशला वाचवण्यासाठी पुन्हा मागे वळेपर्यंत तो लाटांच्या तडाख्यात बेपत्ता झाला होता.
शोधमोहीम आणि मृतदेह प्राप्त
घटनेची माहिती मिळताच पूर्णगड सागरी पोलीस, स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही यश आले नाही. अखेर शनिवारी सकाळी ८ वाजता श्रेयशचा मृतदेह गावखडी किनाऱ्यावर तरंगताना आढळून आला.
परिसरात शोककळा
श्रेयश हा स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर, पावस येथे सहावीत शिकत होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच शाळेवर शोककळा पसरली असून श्रद्धांजली वाहून शाळा बंद ठेवण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
आपल्या डोळ्यादेखत लाडका मुलगा हिरावला गेल्याने गोसावी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रेयशच्या पार्थिवावर त्याच्या मूळ गावी तांदूळवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एका पित्याचा मुलाला वाचवण्यासाठीचा संघर्ष आणि मुलाचा झालेला अंत पाहून संपूर्ण जिल्हा हळहळत आहे.


