हृदयशस्त्रक्रियेनंतर देवगडच्या चिमुकलीला नवे जीवन

0
Google search engine

आरबीएसके अंतर्गत हृदयशस्त्रक्रियेनंतर देवगडच्या चिमुकलीला नवे जीवन

 

देवगड : प्रशांत वाडेकर

देवगड येथील ४ वर्षांची विश्वनिर्मिती प्रकाश घाडी हिला जन्मजात हृदयरोगासाठी (Congenital Heart Disease) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती आता पूर्णपणे ठणठणीत आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. अंगणवाडी येथे आरोग्य तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. पोकळे आणि डॉ. कोळी यांनी विश्वनिर्मिती प्रकाश घाडी हिच्या आजाराचे प्राथमिक निदान केले.

यानंतर दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी कुडाळ येथील राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे डॉ. जी. टी. राणे तसेच जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॅा.श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित टूडी इको (2D Echo) शिबिरात तिच्या जन्मजात हृदयविकाराचे निश्चित निदान करण्यात आले.

शस्त्रक्रिया धोकादायक असल्याच्या भीतीने तिचे आई-वडील व आजी-आजोबा सुरुवातीला तयार नव्हते. मात्र आरबीएसके देवगड टीममधील डॉ. रुपाली पोकळे व पथक यांनी जवळपास वर्षभर सातत्याने समुपदेशन करून कुटुंबीयांना आजाराची गंभीरता व उपचारांचे महत्त्व समजावून सांगितले. अखेर कुटुंबीयांनी शस्त्रक्रियेस संमती दिली.

२२ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील बालाजी हॉस्पिटल येथे डॉ. बालाजी ऐरोनी यांनी तिची यशस्वी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली.शस्त्रक्रियेनंतर विश्वनिर्मितीच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून ती आता निरोगी आणि सक्रिय आहे. तिचे वजनही वाढून वयानुसार सामान्य झाले आहे.

या यशस्वी उपचाराबद्दल कुटुंबीयांनी आरबीएसके देवगड टीम मधील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित कोळी, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली पोकळे ,
औषध निर्माण अधिकारी निलेश जोग, ए.एन.एम श्रीमती ज्योत्स्ना लब्दे तसेच स ग्रामीण रुग्णालय देवगड येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटोदेकर यांचे विशेष आभार मानले. या घटनेमुळे लवकर निदान, सातत्यपूर्ण समुपदेशन आणि वेळेवर उपचार यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.