जन्मजात बालकांना मायेने आंघोळ घालणारी ‘माय’ हरपली

Google search engine

जन्मजात बालकांना मायेने आंघोळ घालणारी ‘माय’ हरपली

सुहासिनी जोशी यांच्या निधनाने तारामुंबरीत हळहळ

देवगड / प्रतिनिधी 
  तारामुंबरी सहकारी मच्छी व्यावसायिक संस्था मर्यादितचे संचालक धनंजय तुकाराम जोशी यांच्या मातोश्री श्रीमती सुहासिनी तुकाराम जोशी (वय ७०) यांचे दि. ९ जुलै २०२६ रोजी पुणे येथे उपचारादरम्यान अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने तारामुंबरीसह देवगड परिसरात शोककळा पसरली आहे.
श्रीमती जोशी यांनी अनेक वर्षे देवगड परिसरातील जन्मजात बालकांना अत्यंत मायेने आंघोळ घालण्याची निःस्वार्थ सेवा केली. मोबदल्याची अपेक्षा न ठेवता प्रत्येक बालकाला आपल्या घरातील लेकराप्रमाणे जपत त्यांनी ही सेवा अखंडपणे सुरू ठेवली. पतीच्या आकस्मिक निधनानंतरही त्यांनी कष्टाने पाच मुलांचा सांभाळ करत त्यांना चांगले शिक्षण दिले आणि समाजसेवेचा वसा कायम जपला.
धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग राहिला. त्यांच्या निधनाबद्दल प.पू. गुरुदास माऊली राऊळ महाराज दत्तप्रसाद मंडळाचे कार्याध्यक्ष यांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा धनंजय, विवाहित चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर तारामुंबरी येथील सागर किनाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाने तारामुंबरी गावाने सेवाभावी, ममतामयी आणि समाजाशी नाळ जपणारी एक प्रेमळ ‘माय’ गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.