१९७१ च्या युद्धातील वीर जवान सूर्यकांत परब यांचे निधन
वाडा गावावर शोककळा
देवगड / प्रतिनिधी
देशसेवेसाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे आणि काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अभिमानास्पद सेवा बजावणारे वाडा परबवाडी येथील ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक सूर्यकांत परब (वय ८३) यांचे ६ जुलै २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण परबवाडी आणि परिसरातून हळहळ व्यक्त होत असून, एका खऱ्या देशरक्षकाला आपण मुकल्याची भावना व्यक्त होत आहे. नुकताच १ जून रोजी त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. देवगड येथील हॉटेल पारिजातचे व्यवस्थापक उदय परब यांचे ते वडील होत.
इंदिरा गांधींनी थोपटली होती पाठीवर थाप!
सूर्यकांत परब यांनी आपल्या सेवाकाळात देशावर आलेल्या अनेक संकटांचा धैर्याने सामना केला. विशेषतः १९७१ च्या भारत-पाकिस्तान ऐतिहासिक युद्धात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, ज्या युद्धात भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली. या अद्वितीय पराक्रमानंतर, तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी स्वतः या सर्व सैनिकांची खास भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते. या ऐतिहासिक क्षणात सूर्यकांत परब यांचाही सहभाग होता. या आठवणी सांगताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून येत असे, असे त्यांच्यासोबत संवाद साधणारे ग्रामस्थ सांगतात.
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सेवा
एक निष्ठावंत सैनिक म्हणून त्यांनी देशाच्या विविध सीमांवर खडतर सेवा बजावली. काश्मीरच्या बर्फाच्छादित पर्वतांपासून ते कन्याकुमारीच्या किनारपट्टीपर्यंत त्यांनी मातृभूमीचे रक्षण केले. निवृत्तीनंतरही त्यांच्या मनात देशप्रेम आणि सैनिकाचा बाणा कायम होता. त्यांच्या निधनाने गावाने आपला एक लाडका आणि मार्गदर्शक सैनिक गमावला आहे.
सूर्यकांत परब यांनी देशासाठी जे सर्वोच्च योगदान दिले, त्याचा सर्व परब कुटुंबियांना आणि ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस संपूर्ण गावाकडून विनम्र अभिवादन आणि मानाचा प्रणाम!” त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंचक्रोशीतील नागरिकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


