तब्बल ५ वर्षांनंतर मालडकर यांच्या घरात आले नळाचे पाणी

Google search engine

तब्बल ५ वर्षांनंतर मालडकर यांच्या घरात आले नळाचे पाणी

उपसभापती अमोल लोके यांच्या प्रयत्नांना यश

 

​देवगड / प्रतिनिधी

“पाणी हेच जीवन” असे म्हटले जाते. मात्र याच जीवनदायी पाण्यासाठी तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली  देवगड तालुक्यातील तांबळडेग दक्षिणवाडा येथील मच्छीमार बांधव दिनेश मालडकर आणि इतर मालडकर कुटुंबांना. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना अनेक वर्षे होडीने खाडी ओलांडून मोर्वे गावात जावे लागत होते. उन्हाळा असो वा पावसाळा, समुद्रातील कष्टाची कामे आटोपल्यानंतर रात्री-अपरात्री पाण्याचे कॅन भरून आणणे हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला होता. मात्र, पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अखेर हा पाणीप्रश्न कायमचा सुटला असून, मालडकर यांच्या घरात तब्बल ५ वर्षांनी नळाला पाणी आले आहे.

​खाडी आणि समुद्राच्या कोंडीत गोड्या पाण्याचा संघर्ष

​तांबळडेग दक्षिणवाडा ही मच्छीमार बांधवांची वस्ती. या कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णतः मच्छीमारीवर अवलंबून आहे. पुढे खाडी, मागे समुद्र आणि मध्ये वस्ती अशी येथील भौगोलिक रचना. आजूबाजूला सर्वत्र खारे पाणी असल्याने पिण्याच्या गोड्या पाण्याचा प्रश्न येथे कायमच गंभीर राहिला आहे. इतर वापरासाठी पाणी उपलब्ध होत असले तरी पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी गोड्या पाण्याची मोठी टंचाई भासत होती. वस्तीपर्यंत नळयोजना पोहोचली होती; मात्र प्रत्यक्षात अनेक कुटुंबांच्या नळाला पाणी मिळत नव्हते. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या, नाराजी व्यक्त करण्यात आली, परंतु त्यातून कोणताही ठोस मार्ग निघत नव्हता. निवडणुका आल्या की आश्वासनांचा वर्षाव व्हायचा, पण प्रत्यक्षात प्रश्न मात्र कायम राहायचा.

​वाळूमय भूभागामुळे प्रशासनासमोर होते कोडे

​या समस्येमागे येथील वालुकामय भूभाग हे प्रमुख कारण होते. संपूर्ण परिसरात वाळूचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याचे झिरपणे वेगाने होत होते. नळयोजनेच्या पाइपलाइनमध्ये कुठे गळती आहे, कुठे पाइप फुटले आहेत किंवा कंपाऊंड बांधकामांमुळे अडथळे निर्माण झाले आहेत का, याचा नेमका शोध लागत नव्हता. परिणामी सागर मालडकर, प्रवीण मालडकर, विक्रांत मालडकर, सुनील मालडकर, दिनेश मालडकर यांच्यासह काही कुटुंबांना नियमित पाणी मिळत नव्हते. अनेक घरांमध्ये पंधरा-पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून एखाद्या वेळी दहा-पंधरा मिनिटे पाणी यायचे. मात्र दिनेश मालडकर यांच्या घरी तब्बल पाच वर्षे नळाला पाण्याचा थेंबही आला नव्हता. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीही या समस्येने हैराण झाले होते. अर्ध्या मार्गापर्यंत पाणी पोहोचत होते, पण पुढे का जात नाही याचा उलगडा होत नव्हता.

​निवडणुकीत दिलेला शब्द लोके यांनी पाळला

​ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांनी आशाच सोडली होती. दरम्यान झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारादरम्यान येथील नागरिकांनी आपली व्यथा उमेदवार अमोल लोके यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी “हा पाण्याचा प्रश्न मी सोडवतो,” असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले होते. निवडणूक झाली आणि अमोल लोके विजयी होऊन पुढे पंचायत समितीचे उपसभापती बनले.

​उपसभापती झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थ जेव्हा त्यांच्या दालनात गेले, तेव्हा त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि या कुटुंबांच्या पाणी समस्येची गंभीर दखल घेतली. “उद्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करा. हा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दुसऱ्याच दिवशी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून त्यांनी संपूर्ण पाईपलाईनची पाहणी केली. पाणीपुरवठा कुठे अडतोय याचा शोध घेतला गेला. अखेर वस्तीपर्यंत नव्याने पाइप टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आणि युद्धपातळीवर काम पूर्ण करण्यात आले.

​५ वर्षांचा संघर्ष संपला, डोळ्यात आनंदाश्रू

​या प्रामाणिक प्रयत्नांमुळे दक्षिणवाड्यातील कुटुंबांच्या नळाला अखेर नियमित पाणी मिळू लागले. अनेक वर्षांचा संघर्ष संपला. मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक आनंद दिनेश मालडकर यांच्या कुटुंबाचा होता. पाच वर्षे रखडलेला प्रश्न, प्रशासनालाही न सुटलेले कोडे आणि एका दिलेल्या शब्दाची प्रामाणिक पूर्तता—दक्षिणवाड्यातील ही घटना केवळ पाणीपुरवठ्याची नाही, तर लोकप्रतिनिधींनी दिलेला शब्द पाळल्यास सामान्य माणसाच्या आयुष्यात किती मोठा बदल घडू शकतो, याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

​”आज वाहणारे हे अश्रू दुःखाचे नाहीत, आनंदाचे आहेत!”

​पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नळाला पाणी आल्यावर दिनेश मालडकर भावनाविवश झाले होते. उपसभापती अमोल लोके यांचे आभार मानताना ते म्हणाले, “लोकेसाहेब, मनापासून आभार. पाण्यासाठी खूप हाल सोसले. अनेकदा वाद झाले, अनेक दारं ठोठावली; पण प्रश्न सुटला नाही. माझी वेदना तुम्ही ओळखली आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला. वादळ-वाऱ्यांचा सामना करत खाडीतून होडीने पाणी आणताना अनेकदा डोळ्यांत अश्रू आले होते. पण आज पाच वर्षांनी माझ्या घरच्या नळाला पाणी आले आहे. आज वाहणारे हे अश्रू दुःखाचे नाहीत, तर आनंदाचे आहेत.”