आंबा बागायतदार व शेतकरी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

Google search engine

आंबा बागायतदार व शेतकरी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सौंदाळे येथून सुरुवात

आंबा बागायतदार व शेतकऱ्यांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

 

देवगड प्रतिनिधी

आंबा व काजू बागायतदार संघाच्या वतीने न्यायासाठी लवकरच मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे. हे आंदोलन इतिहास घडवणार आहे. या आंदोलनासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास सौंदाळे येथून सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती आंबा व काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष काका ढोके यांनी दिली.

सौंदाळे येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीला गणेश गांवकर, किरण टेंबुलकर, अजय तेली आदी उपस्थित होते. आंबा व काजू बागायतदार यांच्या न्यायासाठी लढत असलेल्या आंबा व काजू बागायतदार संघाचा सत्कार शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आला.

यावर्षी आंबा पिकावर आलेल्या अस्मानी संकटामुळे ८० ते ८५ टक्के उत्पादन घटले. आंबा बागायतदार व व्यापारी यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. यासाठी आंबा बागायतदारांनी शासनाकडे हेक्टरी पाच लाख रुपये नुकसान भरपाई मागितली. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मेळावे, मोर्चा, रास्ता रोको, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. मात्र शासन तुटपुंजी मदत देऊ करून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्ताधारी या आंदोलनाला राजकीय वळण लावून शेतकऱ्यांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मात्र आंबा व काजू बागायतदार व व्यापारी आता गप्प बसणार नाहीत. आपल्या न्यायासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी आता मोठे आंदोलन उभारण्यात येणार असून यासाठी देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार रविवारी सौंदाळे येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. प्रत्येक गावात बैठका घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तालुक्यात मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे.