मिठमुंबरी समुद्रात मुंबईचा एक तरुण बेपत्ता

Google search engine

मिठमुंबरी समुद्रात मुंबईचा एक तरुण बेपत्ता

तिघांना वाचवण्यात यश

 

​देवगड:/प्रतिनिधी 

उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबईहून देवगड येथे मित्राकडे आलेल्या चार तरुणांपैकी एकाचा समुद्रात बुडून बेपत्ता झाला आहे, तर तिघांना स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. मिठमुंबरी समुद्रकिनाऱ्यावर रविवारी (२४ मे) सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

​चैतन्य राजेंद्र गुरव (वय २१, रा. नायगाव, दादर, मुंबई) असे समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून, उशिरापर्यंत पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून त्याचा शोध सुरू होता. तर गंभीर अवस्थेतील सोहम जयेश मंडोड (वय २०) याच्यावर देवगडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले होते देवगडला

​मिळालेल्या माहितीनुसार, देवगड येथील ‘गोलतकर निवास’ येथे राहणारा यश राजेंद्र उपरकर (वय २१) याच्याकडे त्याचे मुंबईतील मित्र शुक्रवारी (२२ मे) सुट्टी घालवण्यासाठी आले होते. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण तारामुंबरी-मिठमुंबरी येथील समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते.
​पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना
​समुद्राचा विस्तीर्ण किनारा पाहून मुंबईहून आलेल्या तरुणांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. मिठमुंबरी समुद्राच्या ‘नस्त’ या धोकादायक ठिकाणी चैतन्य राजेंद्र गुरव (२१), ओम दीपक चव्हाण (१८), सोहम जयेश मंडोड (२०, तिघेही रा. नायगाव, दादर) आणि अर्णव राजेश तारी (१८, रा. कांजूरमार्ग) हे चौघेही पाण्यात उतरले, तर यश उपरकर हा किनाऱ्यावरच थांबला होता.

​पोहत असताना चौघेही जण खोल पाण्यात गेले. मात्र, समुद्रातील पाण्याचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने चैतन्य आणि सोहम हे दोघे पाण्यात बुडू लागले.

​मित्राची आरडाओरड आणि ग्रामस्थांची धाव

​आपले मित्र पाण्यात बुडत असल्याचे किनाऱ्यावर उभ्या असलेल्या यश उपरकर याच्या लक्षात येताच त्याने मदतीसाठी जोरदार आरडाओरड केली. यशचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले. ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावत पाण्यात उतरून तिघांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, चैतन्य गुरव हा लाटांच्या तडाख्यात सापडून खोल पाण्यात वाहून गेला.

रुग्णालयात तत्पर उपचार:

पाण्यातून बाहेर काढलेल्यांपैकी सोहम मंडोड याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. तो बेशुद्ध पडल्याने त्याला तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी डॉ. बोरफळकर यांच्या ‘सरिता हॉस्पिटल’मध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केल्यामुळे आता सोहमच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.